एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत लोकसंस्कृतीचा राजधानीत जागर

नवी दिल्ली, २३ : महाराष्ट्रातील ‘ढोल बोहाडा’ नृत्य आणि ओडिसातील बाजसाल या लोकनृत्याने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. नवीन महाराष्ट्र सदन, येथे एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रमांतर्गत “लोकसंस्कृतीचा लोकोत्सव” या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र सदनाच्या सचिव तथा निवासी आयुक्त आर. विमला यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांच्यासह दिल्लीतील मराठी मंडळांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. महाराष्ट्र आणि ओडिशाच्या पारंपरिक लोककलेचे मनमोहक सादरीकरण
या लोकोत्सवात महाराष्ट्रातील आदिवासी लोककला ‘ढोल बोहाड’ तसेच ओडिशाच्या ‘बाजसाल’ प्रसिद्ध नृत्याचा मनमोहक आविष्कार रसिकांनी अनुभवला. महाराष्ट्रातील वामन माळी (मोखाडा, पालघर) यांच्या आदिवासी लोककला गटाने पारंपरिक ढोल बोहाडा यांचे प्रभावी सादरीकरण केले. 20 कलाकारांनी ढोल-ताशांच्या गजरात हे सादरीकरण साकारले. या नृत्यात बालकलाकारासह वयोवृद्ध कलाकारांनी ही नृत्य केले. लोक गायकाच्या आवाजाने सभागृह निनादले. वाघ या प्राण्याचे मानवी जीवननाशी अतुट नाते असून आदिवासी लोकांच्या जीवनात त्याचे किती महत्त्व आहे हे नृत्याच्या माध्यमातून दर्शविण्यात आले.
तसेच ओडिशाच्या दयानंद पांडा यांच्या नृत्य समूहाने लग्नकार्यात होणारे बाजसाल या नृत्याचे सादरीकरण केले.
या लोकनृत्यात 15 लोककलाकारांनी सहभाग घेतला. ढोल, निसान, तासा, मोहरी, झाजं, यांसारख्या पारंपरिक वाद्यांच्या तालावर पारंपारिक वेशभूषेत मनाला ऊर्जा आणि उत्साह निर्माण करणारे या नृत्य सादर करून रसिक प्रेक्षकांची दाद मिळवली.
“एक भारत, श्रेष्ठ भारत” उपक्रमांतर्गत महाराष्ट्र आणि ओडिशा यांच्यात सांस्कृतिक देवाणघेवाणीचा करार करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून दोन्ही राज्यांतील कलाकारांना आपली परंपरा सादर करण्याची संधी मिळाली.
महोत्सवाबद्दल बोलताना निवासी आयुक्त आर. विमला म्हणाल्या, “संस्कृती ही फक्त मनोरंजनासाठी नसून ती समाजाच्या जडणघडणीचा महत्त्वाचा भाग आहे. महाराष्ट्र आणि ओडिशाच्या समृद्ध परंपरांचे दर्शन या महोत्सवाच्या माध्यमातून झाले, ज्यामुळे दोन्ही राज्यांतील बंध अधिक दृढ झाले, झाले असल्याचे त्या म्हणाल्या.
VB/ML/SL
24 March 2025