मराठवाडा , विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

बीड/ चंद्रपूर दि ६– बीड जिल्ह्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली.आष्टी तालुक्यातील कारखेल, डोईठाण, बेलगाव, चिंचाळा या गावांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढले आहे. दुपारनंतर वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने कांदा, आंबा इतर फळबागांचे मोठे नुकसान केले आहे.
कारखेल बुद्रुक यासह आष्टी तालुक्यात तब्बल दोन तास अवकाळी पाऊस झाला. या पावसादरम्यान मोठी गारपीट देखील झाली. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांवर गारपीटीचा सडा पडलाय. दोन तास झालेल्या पावसाने काही ओढ्यांना पाणी देखील आले आहे. तर भाजीपाला आणि फळबागेचं मात्र याने नुकसान झाले आहे.
चंद्रपुरात पुन्हा अवकाळी बरसला
चंद्रपुरात मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागासह चंद्रपुरात पाऊस सुरू असतानाच रात्री पुन्हा वादळवाऱ्यासह पाऊस कोसळला. दरम्यान, बऱ्याच भागातील विद्युतप्रवाह खंडित झाला होता. पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले. मात्र सततच्या पावसामुळे चंद्रपुरातील तापमान घसरले असून वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे.
ML/MS