अविमुक्तेश्वरानंदांना कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक
अलाहाबाद, दि. २६ : अल्पवयीन शिष्यांचं लैंगिक शोषण प्रकरणी स्वामी अविमुक्तेश्वरानंद कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. पीडित अल्पवयीन मुलांच्या वैद्यकीय अहवालात मुलांचं लैंगिक शोषण झाल्याची पुष्टी झाली आहे. बुधवारी पोलिसांनी पीडित दोन्ही मुलांची वैद्यकीय चाचणी केली होती. तक्रारदार आशुतोष ब्रह्मचारी यांनी मुलांचं लैंगिक शोषण झाल्याचा आरोप केला होता.
दरम्यान स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी अटकेपासून वाचण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात अंतरिम जामीन याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती जितेंद्र कुमार यांच्या एकल जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. सुनावणीदरम्यान पोलीस न्यायालयात वैद्यकीय अहवाल सादर करतील. वैद्यकीय अहवालाच्या आधारावर उच्च न्यायालय स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना मोठा झटका देऊ शकतं. जर त्यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही तर पोलीस त्यांना कोणत्याही क्षणी अटक करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. लैंगिक शोषणाच्या आरोपांना त्यांनी सरकारचा कट म्हटलं आहे.