८ वर्षांनी वाढले भारतीयांचे सरासरी आयुर्मान

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जागतिकीकरणाचे वारे वाहू लागल्यानंतर देशात गेल्या काही दशकांपासून उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. तसेच शेतीविषयक विविध योजनांमुळे पौष्टीक अन्नधान्याबाबतही स्वयंपूर्णता आली आहे. यामुळेच गेल्या काही वर्षांत भारतीयांच्या सरासरी आयुर्मानात लक्षणिय वाढ झाली आहे. एका नव्या सर्वेक्षणानुसार १९९० ते २०२१ या कालावधीत जागतिक पातळीवर सरासरी आयुर्मान ६.२ वर्षांनी वाढले. याचवेळी भारतीयांचे सरासरी आयुर्मान ८ वर्षांनी वाढल्याचेही समोर आले आहे. दक्षिण आशिया विभागात भूतानमध्ये आयुर्मानात सरासरी सर्वाधिक १३.६ टक्के वाढ झाली आहे. त्याखालोखाल बांगलादेश १३.३ वर्षे, नेपाळ १०.४ वर्षे आणि पाकिस्तान २.५ वर्षे अशी वाढ आहे.
जागतिक आयुर्मानाबाबत अमेरिकेतील इन्स्टिटय़ूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशन (आयएचएमई) या संस्थेतीत संशोधकांनी संशोधन केले आहे. हे संशोधन लॅन्सेट या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनानुसार अतिसार, श्वसनमार्ग संसर्ग, हृदयविकार यांच्यामुळे होणारे मृत्यू कमी झाल्याने आयुर्मान वाढण्यास मदत झाली आहे. मागील तीन दशकांत भारतीयांचे सरासरी आयुर्मान ८ वर्षांनी वाढले आहे.
आग्नेय आशिया, पूर्व आशिया आणि ओशनिया या विभागांमध्ये सरासरी आयुर्मानात सर्वाधिक ८.३ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. गंभीर श्वसनविकार, हृदयविकार, श्वसनमार्ग संसर्ग आणि कर्करोगामुळे होणारे मृत्यू या विभागांमध्ये कमी झाले आहेत. त्यामुळे सरासरी आयुर्मान वाढले आहे. तर ’जागतिक पातळीवर करोना संकटामुळे सरासरी आयुर्मानातील वाढ काही प्रमाणात रोखली गेली आहे. करोना संकटामुळे सरासरी आयुर्मानात १.६ वर्षांची घट झाली आहे.
’SL/ML/SL
5 April 2024