एलिफंटा लेण्यांची स्वयंचलित डिजिटल ऑडिओ टूर
युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा लाभलेल्या घारापुरी (एलिफंटा) लेण्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ASI) एक अभिनव भेट दिली आहे.
या ऐतिहासिक लेण्यांची माहिती आणि त्यांचे प्राचीन महत्त्व अधिक सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आता ‘स्वयंचलित डिजिटल ऑडिओ टूर’ (Self-guided Digital Audio Tour) प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
भारतीय पुरातत्व विभागाच्या मुंबई मंडळाने सुरू केलेला हा उपक्रम ‘डिजिटल हेरिटेज’ कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या नवीन सुविधेमुळे पर्यटकांना आता कोणत्याही मानवी मार्गदर्शकाशिवाय (गाईड) स्वतःच्या वेळेनुसार आणि सोयीनुसार संपूर्ण लेण्यांचा इतिहास ऐकता येणार आहे.
पुरातत्व विभागाने आखलेल्या मोठ्या धोरणांतर्गत, महाराष्ट्रातील किमान २४ संरक्षित स्मारकांमध्ये टप्प्याटप्प्याने ही डिजिटल प्रणाली लागू केली जाणार आहे. ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासोबतच, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यटनाचा अनुभव अधिक समृद्ध करणे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. यामुळे परदेशी पर्यटकांनाही भाषेची अडचण न येता महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास समजून घेण्यास मदत होणार आहे.
या अभिनव उपक्रमाची माहिती देताना एएसआयच्या मुंबई मंडळाचे अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ अभिजीत आंबेकर म्हणाले की, “आम्ही सुरू केलेली ही प्रणाली म्हणजे एक प्रकारची ‘डिजिटल हेरिटेज वॉक’ आहे. अनेकदा पर्यटक पुरातत्व स्थळांना भेटी देतात, पण तिथल्या वास्तूचे नेमके महत्त्व काय, तिथल्या वास्तूकलेचा अर्थ काय किंवा ते स्मारक इतिहासाच्या दृष्टीने का महत्त्वाचे आहे, याची अचूक माहिती त्यांना मिळत नाही. ही माहितीची दरी सांधण्याचे काम हे तंत्रज्ञान करणार आहे.”