आग्र्यातील औरंगजेब हवेली’ झाली जमीनदोस्त
आग्रा, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील देवस्थाने उद्ध्वस्त करणारा क्रुरकर्मा मुघल शासक औरंगजेबाची आग्र्यातील हवेला आता जमिनदोस्त करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील १७ व्या शतकातील मुबारक मंजिल अर्थात मुघल वारसा स्थळ ज्याला ‘औरंगजेबाची हवेली’ म्हणून ओळखलं जातं. मात्र, ही ‘औरंगजेब हवेली’ आता जमीनदोस्त करण्यात आली आहे. यासह आणखी काही वारसा स्थळे जमीनदोस्त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे राज्य पुरातत्व विभागाने स्मारकाच्या संरक्षणासाठी अधिसूचना जारी केल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत आग्रा येथे मोठ्या प्रमाणावर हे पाडकाम करून पुरातत्व खात्याचे निर्देश धाब्यावर बसवल्याचं यावरून स्पष्ट होत आहे. स्थानिकांचा आरोप आहे की, एका बिल्डरने पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने आक्षेप घेतल्यानंतर आणि यमुनेच्या कडेला पोलीस चौकी असतानाही हे बांधकाम जमीनदोस्त केलं.
दरम्यान, राज्य पुरातत्व विभागाने सप्टेंबरमध्ये एक अधिसूचना जारी केली होती. या अधिसूचनेत एका महिन्यात या जागेला संरक्षित स्मारक घोषित केल्याबद्दल हरकती मागवल्या होत्या. मात्र, त्यावर कोणीही आक्षेप घेतला नाही. दोन आठवड्यांपूर्वी लखनऊच्या अधिकाऱ्यांनी संवर्धन उपाययोजना सुरू करण्यासाठी घटनास्थळाला भेट दिली होती. मात्र, त्यांच्या भेटीनंतर काही दिवसांत लगेचच ‘औरंगजेब हवेली’ जमीनदोस्त करण्यात आली आहे.
या मुबारक मंजिलला इतिहासात एक महत्त्वाचं स्थान आहे. ज्याचे तपशील ऑस्ट्रियन इतिहासकार एब्बा कोच यांच्या ‘द कम्प्लीट ताजमहाल अँड द रिव्हरफ्रंट गार्डन्स ऑफ आग्रा’ या पुस्तकात दिलेलं आहे. औरंगजेबाच्या कारकिर्दीत बांधलेलं हे शाहजहान, शुजा आणि औरंगजेब यांच्यासह प्रमुख मुघल व्यक्तींचं निवासस्थान होतं. तसेच ब्रिटीश राजवटीत या संरचनेत बदल करून ‘कस्टम हाउस’ करण्यात आलं. पुढे १९०२ पर्यंत ते तारा निवास म्हणून ओळखलं जात होतं.
SL/ML/SL
3 Jan. 2025