दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला

नवी दिल्ली,दि. 20 : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर त्यांच्या निवासस्थानी आयोजित साप्ताहिक जनसुनावणी दरम्यान एक धक्कादायक हल्ला झाला. एका तरुणाने तक्रार देण्याच्या बहाण्याने त्यांच्या जवळ जाऊन अचानक कानशिलात लगावली आणि त्यांचे केस ओढण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत मुख्यमंत्री गुप्ता यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली, आणि त्यांना तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. सुदैवाने, डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीला स्थिर असल्याचे सांगितले.
हल्लेखोराची ओळख राजेश खिमजी साकारिया (वय ४१) अशी पटली असून तो गुजरातमधील राजकोटचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार, हल्ला पूर्वनियोजित होता. आरोपीने हल्ल्याच्या २४ तास आधी मुख्यमंत्री निवासस्थानाची रेकी केली होती, हे स्पष्ट झाले आहे.
दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी या घटनेचा निषेध करताना सांगितले की, मुख्यमंत्री गुप्ता या एक खंबीर महिला आहेत आणि त्या आपल्या कामात कोणताही व्यत्यय येऊ देणार नाहीत. जनसुनावणी पूर्वीप्रमाणे सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
ही घटना दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडवणारी ठरली असून सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. दिल्ली पोलिसांनी गुजरात पोलिसांशी संपर्क साधून आरोपीच्या पार्श्वभूमीची माहिती घेतली आहे. या घटनेमुळे मुख्यमंत्री गुप्ता यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे