पुण्यात अतिसूक्ष्म सुवर्ण गणेशमुर्तींचे प्रदर्शन

पुणे दि १:– सकाळ माध्यम समूहातील ‘सकाळ – एनआयई’ (न्यूज पेपर इन एज्युकेशन) आणि ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ यांच्यातर्फे यंदाच्या गणेशोत्सवात शालेय विद्यार्थ्यांसोबतच सर्व वयोगटातील नागरिकांसाठी ‘अतिसूक्ष्म’ सुवर्ण गणेशमूर्तीच्या अनेक कलाकृतींचे प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी उत्साहात झाले. हे प्रदर्शन मंगळवार (ता. २) पर्यंत सकाळी १०.३० ते सायंकाळी ७ दरम्यान सुरू राहणार आहे.
घोले रस्ता येथील राजा रवी वर्मा कलादालनामध्ये नागरिकांसाठी दुर्मिळ सुवर्ण गणेशमूर्तीच्या कलाकृतींचे प्रदर्शन आहे. त्याचे उद्घाटन सिद्धिविनायक ग्रुपचे अध्यक्ष राजेश सांकला यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रदर्शनात नाशिक जिल्ह्यातील गणेशभक्त, कलाकार व जागतिक विक्रमवीर भगवानदास खरोटे यांनी कमीत कमी जागेत एक मिलिमीटरपासून ते अवघ्या सव्वा स्क्वेअर इंच जागेत

सोन्यामध्ये साकारलेल्या विविध सूक्ष्म गणेश मूर्ती पाहता येणार आहेत. खरोटे यांनी सोन्यामध्ये साकारलेल्या गणेश मूर्ती इतक्या सूक्ष्म आहेत की, त्या सूक्ष्म दर्शिकेशिवाय पाहता येत नाहीत.
खरोटे यांनी तब्बल २५६ सूक्ष्म सुवर्ण गणेश साकारले असून, यामध्ये तबला वादक, सनई वादक, हार्मोनिअम वादक, झुल्यावर बसलेला, हातात तिरंगा घेतलेला, चहाची किटली आणि कपबशी घेऊन उभा असलेला श्रीगणेश ते विविध रत्नांवर अगदी मोत्यापासून ते पाचूपर्यंत त्यांनी गणेशाचे रूप साकारले आहे. केवळ भारतातीलच नाही तर परदेशातील कंबोडियन गणपती देखील त्यांनी साकारले आहेत. या सर्व कलाकृती कोणत्याही आधुनिक पद्धतीचा वापर न करता पारंपरिक सोनारी हत्यारांचा वापर करून घडविल्या आहेत. साध्या डोळ्यांना ढोबळ स्वरूपात दिसणाऱ्या या सूक्ष्म सुवर्ण गणेशमूर्ती आपण जेव्हा सूक्ष्मदर्शिकितून पाहतो, तेव्हा मंदिरात जाऊन एका मोठ्या गणेशमूर्तीचे दर्शन घेतल्याचा अनुभव येतो.ML/ML/MS