तामिळनाडुच्या विकासासाठी अभिनेते विजय यांनी एनडीए मध्ये यावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई, दि १६- दाक्षिणात्य अभिनेते विजय यांनी तामिळनाडुतील हितासाठी राजकीय पक्ष काढलेला आहे. अभिनेते विजय थलपती यांची दक्षिणेत अफाट लोकप्रियता आहे. त्यांनी राजकीय पक्ष काढुन निवडणुका लढणे योग्य ठरणार नाही. तामिळनाडुच्या विकासासाठी अभिनेते विजय यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीए मध्ये यावे असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले आहे.
तामिळनाडुत दलितांवर अत्याचाराचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. तामिळनाडुचे मुख्यमंत्री स्टॅलिन हे दलितांवरील अत्याचार रोखु शकलेले नाहीत. त्यामुळे तामिळनाडुतील दलित बहुजनांनी आगामी निवडणुकीत स्टॅलिन यांची सरकार उलथवुन एनडीए ला विजयी करावे असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले आहे. तामिळनाडुत भाजप, एडीएमके, पीएमके, असे एनडीए चे भागिदार आहेत. त्यात रिपब्लिकन पक्षाला सुध्दा एनडीए चा घटक पक्ष म्हणून तामिळनाडुत सहभागी करुन घ्यावे अशी आपली मागणी असल्याचे ना. रामदास आठवले म्हणाले.
तामिळनाडुत रिपब्लिकन पक्षाचे संघटन वाढत आहे. तामिळनाडुत विधानसभेच्या 50 जागांवर रिपब्लिकन पक्षाचा चांगला प्रभाव आहे. त्यामुळे तामिळनाडुत एनडीए तुन रिपब्लिकन पक्ष 10 जागांवर निवडणुक लढण्यास इच्छुक असल्याचे ना. रामदास आठवले यांनी जाहीर केले. चेन्नई येथील कुळीमंथोक, एकमोर येथील डॉनबॉस्को सभागृहात रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख पदाधिका-यांच्या मेळाव्यास ना. रामदास आठवले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तामिळनाडुत एनडीए तुन रिपब्लिकन पक्ष निवडणुक लढेल अशी घोषणा ना. रामदास आठवले यांनी केली. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे तामिळनाडु प्रदेशाध्यक्ष फादर सुसाई, राष्ट्रीय सचिव राजीव मेनन, तसेच तामिळनाडुतील रिपब्लिकन पक्षाचे सर्व जिल्हाप्रमुख आणि राज्यकार्यकारिणीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.KK/ML/MS