चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात !

मुंबई दि.25(एम एमसी न्यूज नेटवर्क) : वंचित बहुजन आघाडी आयोजित ‘आरक्षण बचाव यात्रे’ला मुंबई, चैत्यभूमीवरून सुरुवात झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि वीर भाई कोतवाल यांना अभिवादन करून यात्रेला सुरुवात केली आहे.
ही यात्रा पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे येईल. तिथून सावित्रीबाई फुले यांचे जन्मस्थळ असलेल्या नायगाव (सातारा) येथे जाणार आहे व रात्री कोल्हापूरमध्ये मुक्काम करणार आहे. ओबीसी आरक्षण वाचले पाहिजे,एससी आणि एसटी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट झाली पाहिजे, ओबीसी विद्यार्थ्यांना एससी आणि एसटी च्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणे शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे, एससी एसटी आणि ओबीसींना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळाले पाहिजे, 100 ओबीसी आमदार विधानसभेत पाठवणे, 55 लाख बनावट कुणबी प्रमाणपत्र रद्द करणे हे या यात्रेचे उद्देश आहेत.
यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, अविनाश भोसीकर, ओबीसी नेते प्रदीप ढोबळे यांच्यासह ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी व मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
SW/ML/SL
25 July 2024