राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षांची हत्या

जयपूर, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची आज भरदिवसा जयपूरमधील घरात घुसून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.3 आरोपींनी गोगामेडींवर गोळीबार केला, नंतर ते पळून गेले. गोगामेडी यांना मेट्रो मास हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
गोगामेडी यांच्यासोबत घटनेवेळी उपस्थित असलेले गार्ड अजित सिंग हे गोळी लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना गोगामेडी यांच्या घरी घेऊन गेलेल्या तरुणाचाही हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला. गँगस्टर रोहित गोदाराने हत्येची जबाबदारी घेत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखदेव सिंह गोगामेडी यांचे घर श्यामनगर जनपथवर आहे. मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास तीन हल्लेखोर त्यांच्या घरी पोहोचले. आधी ते सोफ्यावर बसले आणि गोगामेडींशी बोलू लागले. सुमारे 10 मिनिटांनंतर दोन हल्लेखोर उठले आणि त्यांनी गोळीबार केला. गोळीबार सुरू असताना गोगामेडींच्या गार्डने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावरही हल्लेखोरांनी गोळीबार केला.तेथून निघताना एका आरोपीने गोगामेडी यांच्या डोक्यात गोळी झाडली. हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात नवीनला गोळी लागली आणि त्याचाही मृत्यू झाला. दरम्यान गोगामेडी यांच्या संघटनेशी संबंधित लोकांनी रुग्णालयाबाहेर आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.
सुखदेव सिंह गोगामेडी हे राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. याआधी ते दीर्घकाळ राष्ट्रीय करणी सेनेशी संबंधित होते. या वादानंतर राष्ट्रीय राजपूत करणी सेना या नावाने वेगळी संघटना स्थापन करण्यात आली.
पद्मावत चित्रपट आणि गँगस्टर आनंदपाल एन्काउंटर प्रकरणानंतर राजस्थानमध्ये झालेल्या निदर्शनांमुळे गोगामेडी प्रसिद्धीच्या झोतात आले होते.
SL/KA/SL
5 Dec. 2023