सोमवारपासून मुंबईमध्ये बीज महाकुंभ: ‘एशियन सीड काँग्रेस २०२५’
मुंबई दि १५ : यंदाची ‘आशियान सीड काँग्रेस २०२५’ (आशियायी बीज परिषद) सोमवारपासून मुंबईतील रिलायन्स जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सुरू होत आहे. सोमवार, १७ नोव्हेंबर ते शुक्रवार, २१ नोव्हेंबरपर्यंत ही भव्य बीज महापरिषद चालणार आहे.
या महापरिषदेचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. तसेच, या कार्यक्रमात देशाचे केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
भारतासह संपूर्ण आशियासाठी महत्त्वाची परिषद. या सीड काँग्रेसमध्ये बियाणे संशोधनापासून ते व्यापारापर्यंत विविध विषयांवर ‘महाचर्चा’ आणि ‘कॉन्क्लेव्ह’ होणार आहेत. यामध्ये भारतासह आशियायी देशांतील अनेक नामांकित बियाणे उद्योजक, संशोधक आणि कृषीतज्ज्ञ सहभागी होणार आहेत. या परिषदेचे मुख्य आकर्षण म्हणजे इथे होणारे बियाण्यांचे भव्य व्यापार प्रदर्शन (Trade Exhibition) असेल.
आयोजक आणि इतिहास या परिषदेचे आयोजन ‘एपीएसए’ (APSA) आणि नॅशनल सीड असोसिएशन ऑफ इंडिया (NSAI) या संस्थांनी संयुक्तपणे केले आहे. यापूर्वी ही महापरिषद चियांग माई, दिल्ली, हैदराबाद, क्वालालंपूर, बँकॉक, शांघाई, गोवा, बाली, ब्रिस्बेन, जकार्ता, मनिला, हो चि मिन्ह सिटी, सेऊल, कोबे आणि मकाऊ यांसारख्या आशियातील विविध शहरांमध्ये पार पडली आहे.
गुंतवणुकीच्या मोठ्या संधी
तज्ज्ञांच्या मते, आज भारतीय बियाणे बाजार ३.८२ ते ४ अब्ज डॉलर इतका मोठा असून, २०३० पर्यंत तो ५ ते ७ अब्ज डॉलरपर्यंत विस्तारण्याची शक्यता आहे. त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूकदारांसाठी मोठ्या संधी खुणावत आहेत. या महापरिषदेत विविध देशांतील संस्था आणि बियाणे उद्योजकांमध्ये अनेक महत्त्वाचे करार (MoUs) होण्याचीही शक्यता आहे.
हवामान बदलावर मंथन
हवामान बदलाच्या आजच्या काळात शेतीसमोर उभ्या राहणाऱ्या संकटांवर मात करण्यासाठी बियाण्यांची गुणवत्ता आणि हवामान प्रतिरोधक वाण ही काळाची गरज बनली आहे. या परिषदेत प्रामुख्याने भात, कापूस, सोयाबीन, मक्का आणि भाजीपाला बियाण्यांवर विशेष भर दिला जाणार असून त्यावर सविस्तर मंथन होईल.
आयोजकांच्या अंदाजानुसार, या परिषदेत किमान २,००० बीज प्रतिनिधी सहभागी होतील. आशियायी स्तरावरील या सीड काँग्रेसमुळे राज्यातील आणि देशातील बियाणे उद्योजकांसाठी विस्ताराच्या नवीन संधी खुल्या होणार आहेत.
ML/SL/SL