Asian Games – हॉकीमध्ये भारताने जिंकले सुवर्ण, एकूण पदकसंख्या ९५
गाऊंझाऊ, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 13 व्या दिवशी भारताने हॉकीमध्ये सुवर्णपदक जिंकले. भारतीय पुरुष हॉकी संघाने सुवर्णपदकाच्या लढतीत जपानचा 5-1 असा पराभव केला.
भारताकडून मनप्रित सिंगने 25व्या मिनिटाला, हरमनप्रित सिंगने 32व्या आणि 59व्या मिनिटाला, अमित रोहिदासने 36व्या मिनिटाला आणि अभिषेकने 48व्या मिनिटाला गोल केले. जपानकडून तनाकाने 51व्या मिनिटाला संघासाठी एकमेव गोल केला. या विजयासह भारत पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्र ठरला आहे. भारताने आज 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 6 कांस्य पदकांसह एकूण 8 पदके जिंकली आहेत. भारताची एकूण पदकांची संख्या 95 वर पोहोचली आहे.
त्याचबरोबर आज कुस्तीमध्ये महिलांच्या 62 किलो वजनी गटानंतर भारताला 76 किलोग्रॅम फ्रीस्टाइलमध्येही कांस्यपदक मिळाले. भारताच्या किरणने मंगोलियाच्या गानबत अरियुंजरगलचा पराभव करून कांस्यपदक जिंकले. तर भारताच्या अमनने पुरुषांच्या फ्रीस्टाइल 57 किलोग्रॅम प्रकारात कांस्यपदक जिंकले. तसेच ब्रिज गेमच्या सांघिक अंतिम फेरीत भारताने रौप्यपदक पटकावले.
भारतीय पुरुष संघाला तिरंदाजीच्या रिकर्व्ह सांघिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण कोरियाविरुद्ध पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याचवेळी 21 वर्षीय सोनम मलिकने 62 किलो वजनी गटात कांस्यपदकाच्या लढतीत चीनच्या जिया लाँगचा पराभव केला.तिरंदाजी रिकर्व्ह महिला संघानंतर एचएस प्रणॉयने बॅडमिंटन पुरुष एकेरीत कांस्यपदक जिंकले आहे.
मात्र चाचण्यांशिवाय भारताकडून आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरलेला कुस्तीपटू बजरंग पुनिया याला कांस्यपदकाच्या लढतीत जपानच्या यामागुचीविरुद्ध एकतर्फी झालेल्या सामन्यात 10-0 असा पराभव पत्करावा लागला.
SL/KA/SL
6 Oct. 2023