आशिया कप क्रिकेटचे वेळापत्रक जाहीर
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क): पाकीस्तानच्या यजमानपदावरून वादग्रस्त ठरलेल्या आशिया कप २०२३ या स्पर्धेला ३१ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. ही स्पर्धा १७ सप्टेंबरपर्यंत खेळवली जाणार आहे. यावेळी आशिया चषक हा हायब्रीड मॉडेलमध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेत खेळवला जाणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) गुरुवारी स्पर्धेच्या चालू हंगामाचे ठिकाण जाहीर केले.या स्पर्धेतील १३ सामने भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ संघांदरम्यान होणार आहेत. यावेळी ही स्पर्धा हायब्रीड मॉडेल अंतर्गत होणार आहे. या स्पर्धेतील चार सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जाणार आहेत. याशिवाय उर्वरित ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना श्रीलंकेत होणार आहे.
हंगामातील 4 सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत. तर 9 सामने श्रीलंकेत आयोजित केले जातील. या सामन्यांसाठी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 6 संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातून दोन संघ सुपर-4 फेरीत प्रवेश करतील. सुपर-4 फेरीतील अव्वल संघांमध्ये अंतिम सामना खेळवला जाईल.
आशिया चषक स्पर्धेतील पहिल्या गटातील चार सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत. यामध्ये एका गटातील पाकिस्तान विरुद्ध नेपाळ आणि दुसऱ्या गटातील अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश, अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका आणि बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्या सामन्यांचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) कॅलेंडरने 2023 मध्ये होणार्या आशिया कपचे यजमानपद पाकिस्तानला दिले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कॅलेंडर जारी होताच स्पष्ट केले होते की भारतीय संघ खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार नाही. बीसीसीआयने आशिया चषक तटस्थ ठिकाणी आयोजित करण्याची मागणी केली होती, परंतु पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ते मान्य केले नव्हते.
मात्र, पाकिस्तानने ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर आयोजित करण्याचा प्रस्तावही ठेवला होता. हायब्रीड मॉडेलनुसार भारताचे सामने पाकिस्तान सोडून अन्य देशात होणार आहेत. या स्पर्धेतील उर्वरित सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत. भारत फायनलमध्ये पोहोचला, तर फायनलही पाकिस्तानच्या बाहेर असेल.
SL/KA/SL
15 June 2023