अभिनेते अशोक सराफ यांना ‘संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार’

कोल्हापूर दि ६ : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कोल्हापूर शाखेच्या वतीनं प्रतिष्ठित ‘संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार’ यावर्षी ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांना प्रदान करण्यात आला आहे. हा सन्मान कोल्हापूरमधील गायन समाज देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे सभागृहात शनिवारी (4 ऑक्टोबर) भव्य समारंभात दिला गेला. यावेळी अभिनेते मोहन जोशी, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार’चं स्वरूप शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, मानपत्र आणि 51 हजार रुपये रोख असं आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने हा पुरस्कार संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं दिला जातो. गेल्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते डॉ. शरद भुथाडियांचा तर यंदा पद्मश्री अशोक सराफ यांचा या पुरस्कारानं सन्मान करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या अशोक सराफ यांच्या कारकिर्दीची दखल घेत या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली. या पुरस्कार प्रदान सोहळ्यास अनेक नामवंत राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तसेच मंत्री, आमदार, नाट्य परिषदेचे पदाधिकारी आणि असंख्य प्रेक्षकांनी सभागृह फुलून गेलं होतं.
विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील नेते एकाच मंचावर असतानाही सर्व नेतेमंडळींनी व्यासपीठावरील वातावरण राजकीय बनू दिलं नाही. आपल्या भाषणात मिश्किलपणे टोलेबाजी करत, हसत-खेळत सोहळा पार पडला. निवेदक विघ्नेश जोशी यांनी पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर अशोक सराफ आणि त्यांच्या पत्नी, अभिनेत्री निवेदिता सराफ यांची जाहीर मुलाखतही घेतली.
अशोक सराफ यांनी पुरस्कार स्वीकारताना कोल्हापूरशी असलेल्या आपल्या जुने ऋणानुबंध, रंगभूमीवरील सुरुवात आणि या शहराशी निगडीत आठवणींचा भावूक उल्लेख केला. त्यांनी सांगितलं, “ज्या शहरात माझ्या कामाचं पहिलं पाऊल पडलं, तिथेच आज मला हा सन्मान मिळाला. आजच्या या सन्मानामुळे स्वतःला खूपच भाग्यवान समजतो. हा पुरस्कार वेगवेगळ्या पिढ्या आणि रसिकांची मिळणारी पोचपावती आहे. मला लोकांचं मनोरंजन करता आलं यातच मला खरं समाधान आहे.” त्यांनी असंही नमूद केलं की, “हा पुरस्कार आणि हा क्षण मी कधीही विसरू शकणार नाही. मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहीन.ML/ML/MS