अशोक चव्हाण डरपोक, मैदान सोडून पळाले!
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अशोक चव्हाण यांना दोनवेळा मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, आमदार, खासदार अशी विविध पदे काँग्रेस पक्षाने दिली. पक्षात नेतृत्व करण्याची संधी दिली. कालपर्यंत ते काँग्रेस पक्षात होते पण अचानक ते भारतीय जनता पक्षात गेले. अशोक चव्हाण डरपोक आहेत, ते मैदान सोडून पळाले आणि विरोधकांशी हातमिळवणी करून काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला, असा घणाघात आज प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला.
चेन्नीथला यांच्या उपस्थितीत गांधी भवन येथे काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, विधान परिषदेतील गटनेते, माजी मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, माजी मंत्री यशोमती ठाकूर, डॉ. विश्वजीत कदम, आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ, माजी खासदार हुसेन दलवाई, आदी उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, अशोक चव्हाण काँग्रेस पक्ष सोडून गेले असले तरी इतर कोणीही जाणार नाही, मल्लिकार्जून खऱगे, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांसह जोमाने लढा देत राहिल. अशोक चव्हाण दिल्लीत मलिकार्जून खरगे आणि इतर वरिष्ठ नेत्यांना भेटले, परवा बैठकीत उपस्थित होते. काँग्रेस पक्षाने त्यांना नेतृत्व करण्याची संधी दिली तरीही त्यांनी पक्ष सोडला. काँग्रेस पक्षाने अशोक चव्हाण यांच्यावर काय अन्याय केला ? की ED, CEB ला घाबरून ते गेले? याचे उत्तर जनतेला द्यावे. आज वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याने काँग्रस पक्ष कमजोर होणार नाही. पक्ष विचारधारेनुसार काम करत असतो, पार्टी सोडणाऱ्यांना जनता स्विकारत नाही.
काँग्रेस पक्ष आणखी जोमाने काम करेल . लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही विजय संपादन करेल.
भारतीय जनता पक्षाने अशोक चव्हाण यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आदर्श घोटाळ्याचा आरोप केला आणि आज ते भाजपात गेले, भाजपाच्या वॉशिंग मधून धुवून ते स्वच्छ झाले. अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटींच्या घोटाळाच्या आरोप पंतप्रधान मोदींनीच केला होता, त्यांनाही सत्तेत सहभागी करुन घतले. मोदी-शहांना भेटले की भ्रष्टाचाराचे डाग पुसले जातात का? महाराष्ट्र विकास आघाडी मजबूत आहे त्याला कमजोर करण्यासाठी भाजपा धडपड करत आहे. परंतु त्याचा काहीही उपयोग होणार नाही. शरद पवार , उद्धव ठाकरे यांच्याशीही आम्ही चर्चा केली असून मविआ मजबूत आहे आणि महाराष्ट्रातून लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकू असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस पक्षाने अशोक चव्हाण यांना नेहमीच मोठी संधी दिली. अशोक चव्हाण यांना काँग्रेस पक्षात नेतृत्व करण्याची नेहमीच संधी मिळाली पण भाजपात त्यांना ती संधी मिळणार नाही, आता त्यांना मागील रांगेत बसावे लागेल. भाजपा अनेक प्रयत्न करूनही महाराष्ट्रात चांगली कामगिरी करू शकत नाही हे त्यांच्याच सर्वेत दिसत असल्याने देवेंद्र फडणवीस यांची अडचण झाली आहे. त्यामुळे ते त्यांची आणि पक्षाची प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रयत्न करत आहेत पण त्याचा काहीही फायदा होणार नाही. १५ तारखेला काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक आहे त्यानंतर १६ , १७ तारखेला लोणावळ्यात शिबीर आहे. अजूनही वेळ गेलेली नाही अशोक चव्हाण यांनी त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करावा. नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि नांदेड लोकसभेची जागाही काँग्रेस पक्षच जिंकेल असा विश्वासही पटोले यांनी व्यक्त केला.
ML/KA/PGB 13 Feb 2024