अशोक चव्हाण अखेर भाजपा मध्ये सामील

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज अखेर भाजपा मध्ये प्रवेश केला, २१ रुपयांची पावती फाडत त्यांनी भाजपाचे प्राथमिक सदस्य पद प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते स्वीकारले. आपल्याला कोणत्याही पदाची अपेक्षा नसून पक्ष नेतृत्व सांगेल त्यानुसार काम करू असे त्यांनी यावेळी माध्यमांना सांगितले.
काल सकाळी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन नंतर काँग्रेसच्या प्राथमिक सदस्य पदाचाही राजीनामा देणाऱ्या चव्हाण यांनी आपण सध्या कुठल्याही पक्षात जाणार नाही असे सांगितले होते. पुढील दोन दिवसात यावर निर्णय घेण्याची त्यांची भूमिका होती. येत्या १५ तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या छ संभाजीनगर दौऱ्यात त्यांना भाजपा प्रवेश घ्यायचा होता मात्र हा दौरा रद्द झाल्याने आणि १५ तारखेला राज्यसभेची उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख असल्याने आज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश घेऊन टाकला.
यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी चव्हाण यांच्या प्रवेशाने भाजपा अधिक मजबूत झाली असून मराठवाड्यात पक्षाची ताकद वाढल्याचे सांगितले. यासोबतच चव्हाण हे राष्ट्रीय नेते असल्याचे सांगत राज्याच्या राजकारणात ते नसतील असेही सूचित केले. नांदेडचे विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपल्याला दोन पावले घ्यावी लागतील असे सांगत कदाचित त्यांच्या जागेवर नांदेड मधून अशोक चव्हाण यांना लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविली आहे. अशोक चव्हाण यांनी मात्र पक्ष नेतृत्व सांगेल ते काम करू असे यावेळी सांगितले.
येत्या २७ तारखेला राज्यातील सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होत असून या सहाही जागा महायुती जिंकण्याचा प्रयत्न करीत आहे. काँग्रेसच्या आमदारांच्या संख्येमुळे त्यांची किमान एक जागा निवडून येणे अपेक्षित आहे मात्र अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाने काँग्रेसचे आणखी किती आमदार फुटून महायुतीला मदत करतात ते पाहावे लागेल.
ML/KA/PGB 12 Feb 2024