आषाढी एकादशी : पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राला एक करणारा सर्वात मोठा लोकोत्सव

 आषाढी एकादशी : पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राला एक करणारा सर्वात मोठा लोकोत्सव

मुंबई, दि. 17 (राधिका अघोर) : आज देवशयनी आषाढी एकादशी. महाराष्ट्रातले, देशातले आणि जगातलेही सगळे विठ्ठल भक्त वारकरी आज श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात जमले आहेत. युगानुयुगे कटिवर हात ठेवून आहे शांत उभा असलेला तो पांडुरंगही न कंटाळता लाखो भाविकांना दर्शन देतो आहे. जवळपास महिनाभर वारीत नाचत गात आलेल्या सगळ्या भाविकांचा शीण, केवळ त्या दर्शनमात्रे दूर होतो आहे. विठ्ठलाचे केवळ मुख दर्शन घेऊन त्यांची गात्रे तृप्त होत आहेत.

पंढरीची वारी ही महाराष्ट्राची अद्भूत लोकपरंपरा आहे. सावळ्या श्रीकृष्णाचे लोकांमधे मिसळून गेलेले सर्वात लोभस रूप, म्हणजे पंढरीचा विठोबा ! वारी नेमकी केव्हा सुरू झाली, हे कोणालाही माहीत नाही. मात्र संत साहित्यात या वारीचे उल्लेख आढळतात, त्यातून किमान 800 वर्षांची परंपरा वारीला असावी असा अंदाज आहे. इतकी वर्षे सुरू असलेला हा लोकोत्सव तसाच प्रवाही राहणे, नव्हे प्रत्येक पिढीत तो अधिकाधिक समृद्ध होत जाणे, हेच एक मोठे विलक्षण अद्भूत आहे.
तशी तर वर्षातून दोनदा वारी होते. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला. मात्र त्यातही आषाढी एकादशीला अधिक वारकरी पंढरपूरला जातात. महाराष्ट्रात मोसमी पाऊस आणि खरिपाच्या पेरण्या झाल्यावर, सगळा शेतकरी वर्ग, वारीसाठी निघतो. घरटी एक माणूस तरी वारीला जातोच. एकीकडे सृजनाचा उत्सव सुरू असताना, वारकरी, दिंड्या काढून नाचत, गात, अभंग म्हणत वारीला निघतात आणि आषाढीला पंढरपुरात पोहोचतात. वारी दरम्यान होणारी कलात्मक रिंगणे देखील खूप शिस्तबद्ध आणि विलोभनीय असतात. स्त्रिया तुळशी वृंदावन घेऊन तर पुरुष टाळ – मृदुंग आणि चिपळ्यांच्या तालावर नाचत भक्तिरसात न्हाऊन निघतात.

अधून मधून वरुणराजा ही या वारकऱ्यांच्या आनंदात सहभागी होत असतो.
खरंच, वारी हा आनंदाचा, भक्तीचा उत्सव आहे. सर्व जातीभेद, वर्णभेद, उच्चनीचता, आपपर भाव विसरून सगळ्यांना एकत्रित आणणारा उत्सव आहे. जगभरात ही अनोखी परंपरा प्रसिद्ध आहे. इतक्या पिढ्यान् पिढ्या कशाला जातात वारकरी तिथे? कसली ओढ असते त्यांना? तर ती फक्त विठ्ठलाच्या दर्शनाची! इतर काहीही नको असतं. आषाढीच्या दिवशी तर केवळ मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊनच वारकरी सुखाने परत जातात. प्रापंचिक आयुष्यातच इतक्या साध्या भक्तीमार्गाने इतकी निर्मोहिता ही वारी शिकवते. सर्वांमध्ये असलेला विठ्ठल बघण्याची दृष्टी मिळणे, यापेक्षा अध्यात्म ते वेगळे काय ?

आज आपण महाराष्ट्राची अत्यंत विदारक स्थिती बघतो आहोत. राजकारण आणि केवळ काही लोकांचे हितसंबंध यामुळे जातिजातीत विखार पसरला आहे. अशावेळी, सर्व जातींना एकत्र आणत भागवत धर्माची पताका उंचवणाऱ्या संत शक्तीची त्यांच्या प्रेरणेची आपल्याला खूप गरज आहे. हा वैष्णवांचा मेळा पाहून त्या विठ्ठलाने कृपावंत व्हावे आणि अवघा मानव समुदाय एकत्रित करावा.. रागलोभ द्वेष, स्वार्थ विसरून सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी ही वारी आणि एकादशी सार्थ ठरो. आपल्या आणि अखिल मानवजातीच्या कल्याणाची जबाबदारी माणसांनीच आपल्या शिरावर घेत, खरोखर देवांना शयन घेण्याची मुभा देत, देवशयनी एकादशी साजरी व्हावी.
सर्वाँना देवशयनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!!!

ML/ML/PGB 17 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *