आशा वर्कर्सचे दिवाळी बोनस / सानुग्रह अनुदानासाठी धरणे आंदोलन

 आशा वर्कर्सचे दिवाळी बोनस / सानुग्रह अनुदानासाठी धरणे आंदोलन

मुंबई दि.8(एम एमसी न्यूज नेटवर्क):अल्प मानधनावर काम करणाऱ्या मुंबईतील आशा वर्कर्सना मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य सेविकांप्रमाणे दिवाळी बोनस / सानुग्रह अनुदान द्यावे या मागणीसाठी मुंबईतील आशा वर्कर्सनी आज (मंगळवार) 8 ऑक्टोबर पासून आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरू केले आहे.मुंबई परिसरातील अनेक महानगरपालिकांनी त्यांच्या अंतर्गत काम करणाऱ्या आशा वर्कर यांना दिवाळी बोनस/ सानुग्रह अनुदान दिले आहे.

गेल्या वर्षी नवी मुंबई महानगर पालिकेने १४ हजार ,ठाणे महापालिका ६ हजार रुपये , मीरा भाईंदर ५ हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले होते.मात्र मुंबई महानगर पालिकेने आशा वर्करना बोनस/ सानुग्रह अनुदान न दिल्याने आमची दिवाळी अंधारात गेली.असे मुंबई जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनच्यास्वाती तांडेल यांनी सांगितले.आम्ही अनेक वर्षांपासून बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे आशांना दिवाळी बोनस/ सानुग्रह अनुदान मिळावे अशी मागणी करत आहोत. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उत्पन्न उपरोक्त महानगरपालिकांपेक्षा अनेक पटींनी जास्त आहे. पालिकेने आजपर्यंत दिवाळी बोनस/ सानुग्रह अनुदान न दिल्यामुळे आधीच अल्प मानधनावर काम करणाऱ्या आशांची दिवाळी अंधारात गेली आहे. समान काम करणाऱ्या आरोग्य सेविकांना बीएमसी दिवाळी बोनस/ सानुग्रह अनुदान दर वर्षी देत आहे. या वर्षी एनएचएम व बीएमसी आशांनाही तितकीच रक्कम दिवाळी बोनस/ सानुग्रह अनुदान म्हणून द्यावी.अशी आमची मागणी आहे, असे संगीता कांबळे यांनी सांगितले.

मुंबई महानगरात झोपडपट्टीवासियांची लोकसंख्या सुमारे ६५ लाख आहे . त्यांना आरोग्य सेवा देणे गरजेचे आहे. बीएमसी अंतर्गत काम करणाऱ्या आरोग्य सेविकांची पदे कित्येक वर्षे न भरल्याने त्या जागा रिक्त आहेत. त्या जागी आशांनी काम करावे हे बीएमसीला अपेक्षित आहे. १२०० लोकसंख्येला १ आशा वर्कर याप्रमाणे आशा वर्करची भरती करण्यात यावी असे एनएचएमचे दिशानिर्देश आहेत.

या दिशानिर्देश प्रमाणे आशा घेतल्या तर सुमारे ५ हजार एनएचएम आशांची गरज आहे. मात्र त्या ऐवजी फक्त ७०० आशा नेमल्या गेल्या आहेत. उर्वरित सुमारे ४३०० एनएचएम आशांची भरती करण्याचा व त्या जागांवर बीएमसी आशांना समाविष्ट करण्याचा प्रस्ताव एनएचएम व राज्य शासनाकडे पाठवून तो मंजूर करवून घेण्याची मागणी आम्ही केली होती. या विषयावर १८ जुलै रोजी आमच्या शिष्ठमंडळासोबत पालिके सोबत चर्चा झाली. या प्रस्तावाचा पाठपुरावा करून हा निर्णय लवकरात लवकर मार्गी लागावा.आशांना आता सर्व प्रकारचे ऑनलाईन काम देण्यात येत आहे. परंतु त्यांना त्यासाठी मोबाईल दिलेला नाही. रिचार्जचे पुरेसे पैसे देण्यात येत नाहीत. आशांना चांगल्या दर्जाचे स्मार्ट फोन व बाजारातील दराप्रमाणे रिचार्जचे पैसे देण्यात यावेत. केलेल्या सर्व मासिक व विविध नैमित्तिक कामांचे मानधन किंवा मोबदला अनियमितपणे दिल्यास त्यांचा महिन्याचा घरखर्च चालवण्याबाबतच्या समस्या निर्माण होतात.

तरी सर्व प्रकारची मानधने, मोबदला एकत्रितपणे, नियमितपणे व दर महिन्याच्या १० तारखेच्या आत देण्यात यावे. मुंबई महानगर पालिका आशांच्या मोबदल्यावर असलेली ६ हजार रुपयांची मर्यादा काढून त्या जितके काम करतील त्याचा संपूर्ण मोबदला अशांना द्यावा. अशी मागणी ही आरमायटी इराणी व शुभा शमीम यांनी केली.

SW/ ML/ SL

8 Oct 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *