पुण्यातील सदनिकेत आढळल्या तब्बल ३०० मांजरी, पोलिसांची कारवाई

पुणे, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यातील हडपसर भागातील मार्वल बाऊण्टी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या सोसायटीतील सी-901 या 3 BHK फ्लॅटमध्ये रिंकू भारद्वाज आणि रितू भारद्वाज या बहिणींनी 300 हून अधिक मांजरी पाळल्याची बाब समोर आली आहे. सदर सभासदाने एवढ्या मोठ्या प्रमाणात मांजरी का पाळल्या? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मांजरांमुळे सतत येणारा उग्र वास, ड्रेनेजमधून जाणारे दूषित पाणी आणि त्यांच्या रडण्याचा, ओरडण्याचा प्रचंड आवाज यामुळे शेजारी राहणाऱ्यांना त्रास होत होता.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले यांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लॅटधारकांना पुढील 48 तासांत सर्व मांजरी दुसरीकडे हलवून त्यांची योग्य देखभाल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकरणाने सोसायटीतील इतर रहिवाशांमध्ये आरोग्याच्या दृष्टीने चिंता निर्माण झाली आहे.
सोसायटीतील रहिवाशी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर हडपसर पोलिस आणि पुणे जिल्हा पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित फ्लॅटवर छापा टाकला. फ्लॅटधारकांनी सुरुवातीला सहकार्य करण्यास नकार दिला, मात्र दोन तासांच्या विनंतीनंतर त्यांनी दरवाजा उघडला. तपासणीदरम्यान 3 बीएचके फ्लॅटमध्ये 300 पेक्षा जास्त मांजरी आढळल्या, त्यापैकी काही गर्भवती तर काहींना पिल्लेही होती.
पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या माहितीनुसार, या मांजरींचे कोणतेही वैद्यकीय रेकॉर्ड ठेवण्यात आलेले नाही. एकाही मांजरीचे रेबीज लसीकरण किंवा नसबंदी करण्यात आलेली नाही. फ्लॅटमध्ये मांजरांच्या विष्ठेमुळे प्रचंड दुर्गंधी पसरली होती. काही मांजरींना दुखापतही झाल्याचे आढळून आले.
SL/ML/SL17 Feb. 2025