उपराजधानीत वर्षभरात तब्बल १४१ कोटींची सायबर फसवणूक

 उपराजधानीत वर्षभरात तब्बल १४१ कोटींची सायबर फसवणूक

नागपूर, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे देशातील आर्थिक व्यवहार सुलभ झाले असले तरीही याचा गैरवापर करत सर्वसामान्यांना लुबाडणाऱ्या भामट्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या वर्षभरात सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना तब्बल १४१ कोटींना गंडा घातला आहे. सायबर पोलिसांच्या ऑनलाईन पोर्टलवर १३ हजारांवर सायबर फसवणूक झाल्याच्या तक्रारी दाखल आहेत, अशी धक्कादायक माहिती नागपूर पोलिसांनी दिली.

सध्या राज्यात फायनान्सीअल फ्रॉड, बँक फ्रॉड, सोशल मीडिया फ्रॉड, सेक्स्टॉर्शन आणि डिजीटल अरेस्ट या सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. गेल्या जानेवारी ते १५ डिसेंबर २०२४ पर्यंत नागपूर शहरातील अनेकांना सायबर गुन्हेगारांनी गंडा घातला आहे. अनेकांना डिजीटल अरेस्ट करुन त्यांना चोवीस तास ऑनलाईन ठेवून त्यांच्या खात्यातील पैसे परस्पर वळते केले. नागपूर शहरातील नागरिकांची सायबर गुन्हेगारांनी फसवणूक केल्यानंतर सायबरच्या ऑनलाईन पोर्टलवर १३ हजार १४ तक्रारी दाखल केल्या. या तक्रारींमध्ये १४१ कोटी ६६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची नोंद पोलिसांच्या लेखी आहे. त्यापैकी नागपूर सायबर पोलिसांनी १४४ सायबर गुन्ह्यांचा तपास केला. त्यात २१ सायबर गुन्ह्यांची उकल केली आणि त्यात २५ आरोपींना अटक केली.

५ सायबर गुन्हेगारांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल केले. तसेच सायबर गुन्हेगारांना अप्रत्यक्षरित्या मदत करणाऱ्या २२ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली. ५० कोटी ६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. सायबर गुन्हेगारांनी गिळंकृत केलेली २८ कोटी ५६ लाख रुपयांची रक्कम पोलिसांनी बँकेत गोठवले. तसेच ३ कोटी ७५ लाख रुपये तक्रारदारांना परत केले. अप्पर पोलीस आयुक्त संजय पाटील, उपायुक्त मतानी आणि सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमित डोळस यांच्या मार्गदर्शनात पथकाने केली.

SL/ML/SL

27 Dec. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *