त्यागराज खाडिलकर यांना अरुण पौडवाल पुरस्कार प्रदान!

मुंबई, दि.३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, कुशल संगीत संयोजक आणि प्रतिभाशाली संगीतकार दिवंगत अरुण पौडवाल यांच्या स्मृति प्रित्यर्थ देण्यात येणारा “कृतज्ञता गौरव पुरस्कार ” यंदा सुप्रसिद्ध गायक,सूत्र संचालक, अभिनेता तथा संगीतकार त्यागराज खाडिलकर यांना सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल,कवीता पौडवाल- तुळपुळे आणि पौडवाल कुटुंबियांच्या उपस्थिती मध्ये प्रदान करण्यात आला.
या वेळी “स्वरकुल ट्रस्ट”च्या अध्यक्षा डॉ. वीणा त्यागराज यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या “तिमीरातूनी तेजाकडे” या भारतातील पहिल्या अंध दिव्यांग कलाकारांनी गायलेल्या अल्बम मधील अतुल कसबे आणि विजयालक्ष्मी यादव या दोन अंध गायकांना देखील अनुराधाजींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले! ‘स्वरकुल ट्रस्ट’ च्या ‘त्यागराज म्युझिक अकॅडमी’तील अंध गायक विद्यार्थ्यांनी गायलेल्या महाराष्ट्रातील नवोदित गीतकरांच्या त्यागराजजींनी स्वरबद्ध केलेल्या रचनांना उपस्थितांचा भरभरून प्रतिसाद दिला!
त्यागराज यांनी भाषणात अंध, दिव्यांग गायकांच्या हिंदी अलबमची, तसेच अनुराधा पौडवाल यांच्यासोबत ‘भजनगंगा’ या हिंदी कार्यक्रमाची योजना जाहीर केली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध गायक चंद्रशेखर महामुनी यांनी केले.
ML/ML/SL
3 June 2024