दहा विद्यार्थ्यांना शिवसेनेच्या प्रयत्नांनी ५१ लाखांचे अर्थसहाय्य  

 दहा विद्यार्थ्यांना शिवसेनेच्या प्रयत्नांनी ५१ लाखांचे अर्थसहाय्य  

ठाणे दि २४– इंजिनियरिंग, डॉक्टर व तत्सम उच्च महाविद्यालयीन स्तरावर शिक्षण घेणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील  दहा विद्यार्थ्यांना शिवसेनेच्या प्रयत्नांनी मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ५१ लाखांचे कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांनी आनंद आश्रमात उपस्थित राहून यासाठी सहकार्य करणारे ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के आणि मंडळाचे संचालक डॉ. अजगर मुकादम यांचे आभार मानले. 

मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ हे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत कार्यरत असलेले एक महत्त्वाचे मंडळ आहे. या मंडळाचा उद्देश अल्पसंख्यांक समाजातील तरुण-तरुणींना शिक्षण, उद्योगधंदा आणि स्वयंरोजगाराकरता कमी व्याज दराने अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे हा आहे. या माध्यमातून समाजातील विद्यार्थ्यांना व तरुणांना योग्य संधी मिळावी, त्यांची प्रगती व्हावी, यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे.

युती शासनाच्या काळात या मंडळाला विशेष आर्थिक तरतूद करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे ठाण्यात देखील या महामंडळाचे दोन महिन्यांपूर्वी राबोडी येथे कार्यालय सुरू झालं आहे. तेव्हा राष्ट्रवादी पक्षाचे नेते नजीब मुल्ला हेही उपस्थित होते. ठाण्यासह कोकण परिसरातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना व युवकांना या योजनेचा मोठा फायदा होत असून आजवर करोडो रुपयांचे अर्थसहाय्य विद्यार्थ्यांना झाले असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले. 

या मंडळाच्या कामकाजात शिवसेनेचे डॉ. अजगर मुकादम यांची संचालकपदी नियुक्ती ही एक महत्त्वाची पायरी ठरली आहे. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे आणि सततच्या प्रयत्नांमुळे अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. त्यांच्या प्रयत्नांना खासदार नरेश म्हस्के यांचा ठाम पाठिंबा असून, नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली ते सातत्याने अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी कार्यरत आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून नुकतीच ५१ लाख ४३ हजार ६०० रुपयांची आर्थिक तरतूद शिक्षणाकरिता करण्यात आली आहे.

ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली असून, अल्पावधीतच त्यांना याचा लाभ मिळाला आहे. विशेष म्हणजे इंजिनियरिंग, डॉक्टरकी, महाविद्यालयीन स्तरावर शिक्षण घेणाऱ्या दहा विद्यार्थ्यांना या माध्यमातून कर्ज देण्यात आल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली.  

हे सगळं युती सरकारच्या विकासाभिमुख दृष्टिकोनाचे द्योतक आहे. कारण याआधीच्या काँग्रेस शासनकाळात अल्पसंख्यांकांसाठी केवळ मतांच्या राजकारणापुरतीच भूमिका निभावली गेली. त्यांच्या खरी प्रगती आणि आर्थिक विकासाकरिता कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. पण आजच्या युती शासनाने अल्पसंख्यांक समाजाला केवळ आश्वासनं न देता, प्रत्यक्ष कृतीतून मदत उपलब्ध करून दिली आहे. अल्पसंख्यांक तरुणांच्या हातात शिक्षणाचे आणि रोजगाराचे सामर्थ्य देऊन त्यांना समाजाच्या प्रगतीच्या प्रवाहात आणणे हा खरा उद्देश आहे आणि या कामगिरीमुळे भविष्यातही अनेकांना उज्ज्वल वाटचालीची संधी मिळणार असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले.  

यापुढेही ठाण्यातील अल्पसंख्यांक समाजातील तरुण-तरुणींना शिक्षण, उद्योगधंदा आणि स्वयंरोजगाराकरता दर महिन्याला अर्थसहाय्य मिळण्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनखाली सातत्याने प्रामाणिक प्रयत्न करू असे डॉ. अजगर मुकादम यांनी यावेळी सांगितले.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *