अदानींविरुद्ध अमेरिकेत अटक वॉरंट जारी
न्यूयॉर्क, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंडेनबर्ग प्रकरणातून थोडक्यात बचावलेले भारतीय उद्योजक गौतम अदानी यांच्यावर आता जागतीक स्तरावरून अटक वॉरंटची नामुष्की आली आहे. गुंतवणूकदारांची कोट्यवधीची फसवणूक केल्या प्रकरणी अमेरिकेत अदानीविरोधी अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. जागतीक पातळीवरून अदानींवर तीन प्रकारचे आपत्ती कोसळल्याचे पहायला मिळत आहे. भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत सौरऊर्जेशी संबंधित कंत्राट मिळवण्यासाठी लाचखोरी आणि फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.. न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टात या प्रकरणाची नोंद करण्यात आली होती. गौतम अदानी आणि सागर यांच्याविरोधातही अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. तथापि, गौतम किंवा सागर अदानी अमेरिकेच्या न्यायालयात हजर होतील की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गौतम अदानी कोणत्या देशात राहतात हे स्पष्ट नाही. अद्याप एकाही आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले नाही.
ही बातमी आल्यानंतर अदानींची संपत्ती 1.02 लाख कोटींनी कमी झाली. दुसरीकडे, केनियाने अदानी समूहासोबतचा पॉवर ट्रान्समिशन आणि विमानतळ विस्तारीकरणाचा करार रद्द केला. दोन्ही सौदे 21,422 कोटी रुपयांचे होते. काल अदानी समूहाच्या 10 पैकी 9 समभाग घसरले. शुक्रवारीही अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण अपेक्षित आहे.
अमेरिकेत उद्योगपती गौतम अदानी यांच्यासह 8 जणांवर कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. युनायटेड स्टेट्स ॲटर्नी ऑफिसचे म्हणणे आहे की, भारतात सौरऊर्जेशी संबंधित कंत्राटे मिळवण्यासाठी अदानी यांनी भारतीय अधिकाऱ्यांना 265 मिलियन डॉलर (सुमारे 2200 कोटी रुपये) लाच दिली किंवा देण्याची योजना आखली होती.
हे संपूर्ण प्रकरण अदानी ग्रुपची कंपनी अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि अन्य एका फर्मशी संबंधित आहे. 24 ऑक्टोबर 2024 रोजी न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टात हे प्रकरण नोंदवण्यात आले. बुधवारी झालेल्या सुनावणीत गौतम अदानी, त्यांचा पुतण्या सागर अदानी, विनीत एस. जैन, रणजीत गुप्ता, सिरिल कॅबेनिस, सौरभ अग्रवाल, दीपक मल्होत्रा आणि रूपेश अग्रवाल यांना आरोपी करण्यात आले आहे.
SL/ML/SL
22 Nov. 2024