धर्मादाय रुग्णांच्या मदतीसाठी आता आरोग्यदूत आणि डॅशबोर्ड

मुंबई दि ३ — पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यू संदर्भात दोषी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यांचा वैद्यकीय व्यवसाय परवाना रद्द करण्याची शिफारस मेडिकल कौन्सिलला करण्यात आली आहे अशी माहिती विधी आणि न्याय विभागाचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली.
याबाबतची लक्षवेधी सूचना सना मलिक यांनी उपस्थित केली होती, त्यावर अतुल भातखळकर, अजय चौधरी, चेतन तुपे आदींनी उपप्रश्न विचारले. मृत गर्भवती महिलेच्या दोन्ही अनाथ मुलांच्या नावे चोवीस लाखांची रक्कम मुदत ठेवीत जमा करण्यात आली आहे असं ही मंत्री म्हणाले.
याशिवाय राज्यात धर्मादाय रुग्णालयामध्ये गरीब आणि दुर्बल घटकातील रुग्णांना दहा टक्के खाटा राखीव ठेवण्यासाठी मंत्रालय स्तरावर डॅशबोर्ड तयार करण्यात आला आहे, त्यावर कायमस्वरूपी देखरेख आहे. सर्वसामान्य नागरिकांना ही माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे असं मंत्री म्हणाले. येत्या दिवसात १८६ आरोग्यदूत नेमून त्यांच्या मार्फत या रुग्णालयात गरजू रुग्णांना मदत केली जाणार आहे अशी माहिती राज्यमंत्री जयस्वाल यांनी यावेळी दिली. ML/ML/MS