पिंपरी चिंचवड ते निगडी या मेट्रो विस्तारित मार्गाला मान्यता

पुणे, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मेट्रोच्या स्वारगेट ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका या मार्गिकेचा नैसर्गिक विस्तार पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी होणे गरजेचे होते. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी या विस्तारित मार्गासाठी आता केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे.
पुणे मेट्रोकडून सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) बनवण्यात आला आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या मान्यतेनंतर राज्य तसेच केंद्र शासनाकडे तो पाठवण्यात आला. महा मेट्रो तर्फे त्याचा पाठपुरावा करून सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याचा सतत पाठपुरावा चालू ठेवला, त्यामुळे आज भारत सरकारच्या गृहनिर्माण तथा शहरी आवास मंत्रालयाकडून अंतिम मान्यता देण्यात आली.
या मार्गाची एकूण लांबी ४.४१४ किलोमीटर इतकी आहे. हा मार्ग संपूर्णतः उन्नत असणार आहे. या मार्गावर चिंचवड, आकुर्डी आणि निगडी ही तीन स्थानके असणार आहेत. या मार्गासाठी एकूण खर्च ९१०.१८ कोटी इतका असून या मार्गाचे काम ३ वर्षे ३ महिन्यांमध्ये पूर्ण होणार आहे. महा मेट्रोने हे काम जलद करण्यासाठी जनरल कन्सल्टन्सी नेमण्यासाठी तसेच या प्रकल्पाचा सोशल इम्पॅक्ट असेसमेंट बनविण्यासाठी निविदा आधीच काढल्या आहेत. लवकरच यांनी मार्गीकेच्या सिव्हिल, विद्युत आणि सिग्नल या कामासाठीच्या निविदा काढण्यात येऊन ठेकेदारांच्या नेमणूका करण्यात येतील आणि प्रत्यक्षात तीन ते चार महिन्यात कामाला सुरुवात होईल.
याप्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी म्हटले आहे की, “पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी हा विस्तारित मार्ग होणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे चिंचवड, आकुर्डी आणि निगडी हे भाग मेट्रो नेटवर्कला जोडले जातील तसेच या परिसरात राहणाऱ्या लाखो लोकांना याचा फायदा होईल महा मेट्रो हे काम नियोजित वेळेत म्हणजे ३ वर्षे ३ महिन्यांत पूर्ण करेल.”
ML/KA/SL
23 Oct. 2023