रत्नागिरीतील ग्रामीण भागात शासकीय गोदाम बांधकामास ११.५२ कोटींची मान्यता

मुंबई, दि १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, मंडणगड, लांजा आणि गुहागर या तालुक्यांतील निवडक गावांमध्ये प्रत्येकी एक अशा चार नवीन शासकीय गोदामांसाठी ११.५२ कोटी रुपये खर्चास अटींसह प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ही मान्यता ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मिळाली आहे. या गोदामांमुळे अन्नधान्य, औषध साठा, आपत्ती व्यवस्थापन साहित्य आणि ग्रामपंचायतींच्या दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक साधनसामग्रीचे योग्य साठवण होऊ शकणार आहे.
या गोदामांचा थेट लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यांना माल साठवण्याची सुविधा मिळेल, योग्य बाजारपेठ मिळवणं सोपं होईल आणि गोदामात ठेवलेल्या मालावर तारण म्हणून कर्ज मिळू शकणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल. गोदामांची एकूण क्षमता ३१०० चौ.मी. इतकी असून कामे दर्जा राखून आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कामांमध्ये कोणताही प्रकारचा हलगर्जीपणा किंवा अपव्यय टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक टप्प्यावर प्रशासनाची देखरेख असून दर्जेदार तसेच कार्यक्षम कामांसाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. या संदर्भात बोलताना राज्यमंत्री कदम म्हणाले, “शासनाच्या निधीतून ग्रामीण भागाला आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ही गोदामे केवळ इमारती नसून गावकऱ्यांच्या सेवेसाठी उभारली जाणारे विश्वासाचे केंद्र आहेत.”