कवितेच्या माध्यमातून नात्यांबद्दलची कृतज्ञता
ठाणे, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क): सध्याच्या धावपळीच्या जगात आईची मम्मी अन् बाबाचा डॅडा झाला आहे. सगळ्या नात्यालाच यांत्रिकता आली असून भावनांना, नात्याला निरोप देण्याची वेळ आली आहे. पण अशा परिस्थितीतही कवितेच्या माध्यमातून नात्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा वेगळा भाव रघुनाथ बापट यांच्या कवितांमधून अनुभवायास मिळतो असे गौरोद्गार प्रसिद्ध कवी-गीतकार प्रविण दवणे यांनी येथे काढले.
कवी-गीत आणि संगीतकार रघुनाथ बापट यांच्या भाव फुलोरा या कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात दवणे बोलत होते. ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात पार पडलेल्या या प्रकाशन सोहळ्यास ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त आणि गझलकार संदीप माळवी, बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख, सरचिटणीस अविनाश दौंड, कवी प्रशांत डिंगणकर, माजी नगरसेवकर नारायण पवार आणि या पुस्तकाचे प्रकाशक अनघा प्रकाशनचे मुरलीधर नाले आदी मान्यवर उपस्थित होते.
भाव फुलोरा हा विविधरंगी गीतांचा फुलोरा घेऊन बापट हे रसिकांच्या भेटीस येत आहेत. त्यात स्फूर्ती गीतापासून, निसर्ग गीते, भक्ती गीते, प्रेम गीते असे सर्वच रंग अगदी विनासायास आलेले आहेत. विशेष म्हणजे आपण कोणत्या गीतामधून कोणत्या प्रकारचा आशय व्यक्त करीत आहोत याचे भान बापट यांना असल्याचे भाव फुलोरा वाचतांना पानोपानी जाणवते.
आशयाप्रमाणे शब्द रंगछटा बदलण्याचे कसब त्यांच्याकडे आहे, हे भाव फुलोराचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल असे स्पष्ट करीत दवणे यांनी बापट यांचे काव्य जगण्याचे मुल्य, नात्याबद्ददलची कृतज्ञता व्यक्त करणारे असल्याचे सांगितले. तर सरकारी नोकरीत असूनही नोटेच्या पलिकडे जाऊन, गाण्यांच्या नोटेशनमध्ये घुसून आपले वेगळेपण जपणाऱ्या बापट यांच्या कवितेमध्ये भावभावनांचा अद्भुत अविष्कार असल्याचे संदीप माळवी यांनी सांगितले.
सरकारी नोकरी, चळवळीतील कार्यकर्ता म्हणून काम करतानाही आपले संगीत आणि गाण्यांवरील प्रेम जपत बापट यांनी निर्माण केलेला हा फुलोरा सर्व प्रकारच्या काव्य रंगाचा आहे, त्यामुळे तो सर्वत्र दरवळेल असा विश्वास अविनाश दौैंड यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष संभाजी बापट यांनी केले. तर उपस्थितांचे आभार प्रज्ञा बापट यांनी केले.
ML/KA/SL
16 Jan. 2023