श्रीरंग बारणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

पुणे, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री बाळा भेगडे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, अमर साबळे, आमदार प्रशांत ठाकूर, अण्णा बनसोडे, सुनील शेळके, अश्विनी जगताप, उमा खापरे, महेश बालदी आदी उपस्थित होते.
आकुर्डी खंडोबा माळ येथे श्री खंडेरायाचे आशीर्वाद घेऊन खासदार बारणे यांच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. ढोल ताशांचा दणदणाट, भगव्या टोप्या, फेटे, भगवे झेंडे, धनुष्यबाण चिन्ह, महायुतीतील पक्षांचे झेंडे घेऊन लोकसभा मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीतील महिलांची संख्या देखील लक्षणीय होती. ‘अब की बार, चार सौ पार’, ‘फिर एक बार, मोदी सरकार’, ‘महायुतीचा विजय असो’, ‘आप्पा बारणे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘होणार होणार, हॅटट्रिक होणार’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
ML/ML/PGB 22 APR 2024