हिंदू मंदिरांमधून साईंच्या मूर्ती हटवण्याचं आवाहन
लखनऊ, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरातील करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डी येथील संत साईबाबा हे हिंदू धर्मिय होते की मुस्लीम धर्मिय या विषयी अनेक प्रवाद आढळून येतात. असे असले तरही विविध धर्म, जाती, पंथांचे लोक त्यांचे भक्त आहेत. शिर्डी येथील साई मंदिरात अगदी हिंदू देवतेप्रमाणेच साईंची यथासांग पूजा केली जाते. देशात आणि जगात अनेक मंदिरामध्ये अन्य देवतांसोबत साईंच्या मूर्तीचीही स्थापना केली जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून देशातील गढूळलेल्या धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यावरणात साई हिंदू नसून मुस्लीम असल्याची वाद झडू लागले आहे. यावर आक्रमक होत अखिल भारतीय हिंदू महासभेने सनातन धर्मियांना हिंदू मंदिरांमधून साईंच्या मूर्ती हटवण्याचं आवाहन केलं आहे.
हिंदू महासभाचे प्रवक्ता शिशिर चतुर्वेदी यांनी असंही सांगितलं, की साई ट्रस्टने राम जन्मभूमीसाठी पाठिंबा देण्यास नकार दिला होता. साई मुस्लिम आहेत, त्यांचा रामजन्मभूमी आणि प्रभू राम यांच्याशी काहीही संबंध नाही, असं ट्रस्टकडून सांगण्यात आल्याचं ते म्हणाले.
उत्तर प्रदेशात साई बाबांच्या मूर्ती हिंदू मंदिरातून हटवण्याबाबतचं प्रकरण चर्चेत आलं आहे. वाराणसीमधील गणेश मंदिरातून साई बाबांची मूर्ती हटवल्यानंतर आता लखनऊच्या मंदिरातूनही साईंची मूर्ती हटवण्याची मागणी होत आहे. याबाबत हिंदू महासभेचे प्रवक्ते शिशिर चतुर्वेदी म्हणाले की, साई हे फकीर आहेत, त्यामुळे त्यांना देवाशेजारी बसवता येत नाही. काल एका हिंदू संघटनेच्या सदस्यांनी कैसरबाग येथील मंदिर गाठून साईबाबांची मूर्ती हटवण्याचा प्रयत्न केला. संस्थेच्या सदस्यांनी मंदिराच्या पुजाऱ्याला साईबाबांची मूर्ती हटवण्याचं आवाहन केलं होतं.
अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते शिशिर चतुर्वेदी म्हणाले की, शंकराचार्याजींनी सांगितलेलं, की फकीरांचा पुतळा आमच्या देवतांच्या शेजारी बसवता येणार नाही. ते साई बाबा म्हणून प्रसिद्ध आहेत. बॉलीवूडचा पैसा वापरुन शिर्डीच्या साईबाबांवर एक गाणं बनवण्यात आलं असून, हा प्रोपागेंडा पसरवण्यात आला आहे. याबाबत शिशिर चतुर्वेदी यांनी देशभरातील सर्व सनातन धर्मियांना आवाहन केलं की, त्यांनी मंदिराच्या पुजाऱ्याला त्यांच्या जवळच्या मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवण्याची विनंती करावी.
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी याबाबत बोलताना सांगितलं, की मंदिरांमध्ये केवळ धर्मग्रंथातील देवताच हव्यात. काही कारणास्तव अशास्त्रीय मूर्ती मंदिरात असतील, तर अशा अशास्त्रीय मूर्ती मंदिरातून काढून टाकाव्यात. बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी साई बाबांबद्दल बोलताना सांगितलं, की साईबाबा संत असू शकतात, फकीर असू शकतात, पण ते देव असू शकत नाहीत.
SL/ML/SL
3 Oct. 2024