चित्रपट निर्मात्या अनुपर्णा रॉय यांची विक्रमी कामगिरी
दिग्दर्शिका अनुपर्णा रॉय यांनी आपल्या पहिल्याच चित्रपटासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा सन्मान मिळवला आहे. त्यांच्या ‘सॉन्ग्स ऑफ फॉरगॉटन ट्रीज’ या चित्रपटाला इटलीतील प्रतिष्ठित व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘ओरिझोन्टी’ विभागात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला दिग्दर्शक ठरल्या आहेत, ही बाब अत्यंत अभिमानास्पद आहे.‘सॉन्ग्स ऑफ फॉरगॉटन ट्रीज’ ही कथा मुंबईतील दोन स्थलांतरित महिलांच्या आयुष्याभोवती फिरते. त्यांच्या एकाकीपणाचा, संघर्षाचा आणि नात्यांमधील नाजूक क्षणांचा वेध घेणारा हा चित्रपट आहे.
अनुपर्णा रॉय यांनी या चित्रपटात स्त्रीच्या अंतर्मनातील आवाजाला जाग दिली असून, हा चित्रपट त्या प्रत्येक महिलेला समर्पित आहे जिला कधीही दुर्लक्षित केले गेले आहे, असे त्यांनी पुरस्कार स्वीकारताना भावनिक शब्दांत व्यक्त केले.या चित्रपटात नाज शेख आणि सुमी बघेल यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाची निर्मिती बिभांशु राय, रोमिल मोदी आणि रंजन सिंग यांनी केली असून, छायांकन देबजीत सामंता आणि संकलन आशिष पटेल यांनी केले आहे. संगीत निशांत रामटेके यांचे आहे.
अनुपर्णा रॉय यांनी २०२३ मध्ये ‘रन टू द रिव्हर’ या लघुपटातून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.या यशामुळे भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली असून, अनुपर्णा रॉय यांचे अभिनंदन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यांच्या या विक्रमी कामगिरीमुळे अनेक नवोदित चित्रपट निर्मात्यांना प्रेरणा मिळेल.