टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी आणखी एक पाणबुडी सज्ज

 टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी आणखी एक पाणबुडी सज्ज

न्यूयॉर्क, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

जगप्रसिद्ध महाकाय टायटॅनिक जहाजाला जलसमाधी मिळून शतक उलटले तरीही त्याबद्दल लोकांना असलेले कुतुहल अजूनही शमलेले नाही. याच कुतुहलापोटी या जहाजाचे भग्नावशेष पाहण्यासाठी गेलेल्या टायटन पाणबुडीचा ११ महिन्यांपूर्वी समुद्रात स्फोट झाला होता. यामध्ये पाच जण मृत्यूमुखी पडले होते. एवढी भीषण आपत्ती घडून गेलेली असतानाही आता आणखी एक अमेरिकन अब्जाधीश टायटॅनिकचे अवशेष पाहण्याच्या कामगिरीवर निघाला आहे. अमेरिकन रिअल इस्टेट अब्जाधीश लॅरी कॉनर ट्रायटन सबमरिनर्सचे सह-संस्थापक पॅट्रिक लाहे यांच्यासोबत या सहलीत असतील.यासाठी कॉनरने ट्रायटन 4000/2 एक्सप्लोरर नावाचे सबमर्सिबल डिझाइन केले आहे. त्याची किंमत 166 कोटी रुपये आहे. ते समुद्रात 4 हजार मीटर खोलीपर्यंत जाऊ शकते, म्हणून त्याला ‘4000’ असे नाव देण्यात आले आहे. ट्रायटन पाणबुडी कधी प्रवासाला निघेल याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलला दिलेल्या मुलाखतीत लॅरी म्हणाले, “त्यांना जगाला दाखवायचे आहे की महासागर किती शक्तिशाली आहे तसेच तो किती सुंदर आहे. जर तुम्ही योग्य पावले उचलली, तर एक सहल तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलू शकते. “

ट्रायटन पाणबुडीचे सह-संस्थापक पॅट्रिक पॅट्रिक यांनी डब्ल्यूएसजेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “गेल्या वर्षी जेव्हा टायटन पाणबुडीचा स्फोट झाला तेव्हा कॉनरने मला फोन केला आणि सांगितले की आम्हाला नवीन पाणबुडी तयार करायची आहे. ती प्रवाशांना टायटॅनिकच्या ढिगाऱ्यापर्यंत सुरक्षितपणे घेऊन जाऊ शकते. आम्हाला हे सिद्ध करावे लागेल की टायटन पाणबुडी सदोष होती, परंतु प्रत्यक्षात हा प्रवास तितका धोकादायक नाही.

यापूर्वी गेल्या वर्षी 18 जून रोजी टायटन पाणबुडी अटलांटिक महासागरात 12 हजार फुटांवर बुडाली होती. ती काही वेळातच बेपत्ता झाली. 4 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर 22 जून रोजी टायटॅनिक जहाजापासून 1600 मीटर अंतरावर त्याचे अवशेष सापडले. त्यात 4 पर्यटक आणि एक पायलट होते.टायटन पाणबुडी 18 जून रोजी (भारतीय वेळेनुसार) संध्याकाळी 5:30 वाजता अटलांटिक महासागरात सोडण्यात आली. 1:45 तासांनंतर ती बेपत्ता झाली. पाणबुडीचा स्फोट झाला असावा असा अंदाज होता. अमेरिकेच्या नौदलाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, टायटॅनिक जहाजाजवळ टायटन पाणबुडीचे शेवटचे लोकेशन नोंदवले गेले. बेपत्ता झाल्यानंतर काही वेळाने रडारवर स्फोटाशी संबंधित काही सिग्नलही सापडले. ही पाणबुडी ओशन गेट कंपनीची टायटन सबमर्सिबल होती. त्याचा आकार ट्रकएवढा होता. ते २२ फूट लांब आणि ९.२ फूट रुंद होते. ही पाणबुडी कार्बन फायबरपासून बनलेली होती. टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी प्रति व्यक्ती २ कोटी रुपये शुल्क आकारण्यात आले होते. या पाणबुडीचा वापर समुद्रातील संशोधन आणि सर्वेक्षणासाठीही करण्यात आला.

ML/ML/SL

28 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *