शुक्रवारी अण्णाभाऊ साठे यांची जयंती जल्लोषात होणार!

मुंबई, दि ३१: लोककलेचा दीपस्तंभ आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालयाच्या विद्यमाने, शुक्रवार दि.१ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी सात वाजता गिरगावच्या “साहित्य मंदिर” मध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या अजरामर साहित्यावर आधारित “गर्जना शाहिरांची” या लोकरुचीप्रधान कार्यक्रमाने संपन्न होणार आहे! कार्यक्रमाला मुंबईचे पालकमंत्री आणि सांस्कृतीकमंत्री ऍड.आशिष शेलार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
लोककलेत निष्ठा वाहिलेले कलावंत शशांक बामनोलकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या लोकरुचीप्रधान कार्यक्रमाला महाराष्ट्राचे लोकप्रिय शाहीर मधुकर खामकर,शाहीर दत्ताराम म्हात्रे आणि शाहीर निशांत शेख या ज्येष्ठ शाहिरी कलावंतांबरोबरच
शाहीर रामनंद उगळे, शाहीर निलेश जाधव, शाहीर अविरत साळवी, गायक चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांनी सादरीकरणात मोलाचा वाटा उचलला आहे.
कार्यक्रमाचे कथावाचन श्रीनिवास नार्वेकर यांचे असून नृत्य संघ अश्विनी कारंडे आणि गणेश कारंडे,आकांक्षा कदम (लावणी) यांच्या नृत्याविष्कारातून संपन्न होणाऱ्या “गर्जना शाहिरांची” हा कार्यक्रम बहारदार होणार आहे. सूत्रसंचालन प्रतीक जाधव करणार आहेत. प्रवेश विनामूल्य असल्याने मुंबईच्या रसिकांना ही पर्वणीच ठरणार आहे. KK/ML/MS