विधानसभा उपाध्यक्षपदी आण्णा बनसोडे बिनविरोध

मुंबई दि. २६ — विधानसभेच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आण्णा बनसोडे यांची आज बिनविरोध निवड झाल्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात जाहीर केलं. त्यानंतर मुख्यमंत्री , दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष गटनेते यांनी बनसोडे यांना उपाध्यक्ष पदाच्या आसनावर स्थानापन्न केलं.
चहाच्या टपरीवर काम करणारे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले, रिक्षा चालवणारे एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले, आता पानाची टपरी चालविणारे आण्णा बनसोडे विधानसभेचे उपाध्यक्ष झाले, यामुळे सामान्य घरातील व्यक्ती मोठ्या पदावर गेल्याचं समाधान मिळालं असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अभिनंदन प्रस्तावात सांगितलं.
विरोधकांनी सहकार्य केल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आभार मानले.
शिवसेना उबाठा पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी अभिनंदन प्रस्तावावर बोलताना सत्तारूढ पक्षाने ही निवड बिनविरोध होण्यासाठी संपर्क देखील साधला नाही याबद्दल खंत व्यक्त केली, त्यानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्ष यांच्या कार्यालयात लक्षवेधी सूचना स्वीकारण्याबाबत काही गैरप्रकार घडल्याचा उल्लेख केल्यावर सत्तारूढ सदस्य आक्रमक झाले, त्यांनी हे वक्तव्य कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली. अध्यक्षांनी तपासून ते काढण्याचं जाहीर केलं.