अखेर अनिल देशमुख तुरुंगाबाहेर
मुंबई दि.28( एम एमसी न्यूज नेटवर्क): १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची अखेर तब्बल १ वर्ष, १ महिना आणि २७ दिवसांनी तुरुंगातून सुटका झाली आहे. ईडी आणि सीबीआय प्रकरणात मागील अनेक दिवसांपासून त्यांच्याकडून जामिनासाठी प्रयत्न सुरू होता. त्यांना आधी ईडी प्रकरणात आणि नंतर सीबीआय प्रकरणात जामीन मंजूर झाला. मात्र, सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी वेळ मागितल्याने त्यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला होता. अखेर आज अनिल देशमुख तुरुंगाबाहेर आले.
सीबीआय प्रकरणात एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने अनिल देशमुखांना जामीन मंजूर केला. या प्रकरणात १०० कोटी वसुलीचे खोटो आरोप देशमुखांवर केल्याचा युक्तीवाद देशमुख यांच्या वकिलांनी केला होता. “या प्रकरणामध्ये कुठलाही पुरावा नसताना आरोप करण्यात आले. या प्रकरणात २०२१ मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर एप्रिल २०२२ मध्ये बेकायदेशीरपणे अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली. परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांनी देशमुख यांना अडकवण्याचा प्रयत्न केला,” असा युक्तीवाद देशमुख यांचे वकील विक्रम चौधरी यांनी न्यायालयासमोर केला होता.
अनिल देशमुख यांच्यावर गृहमंत्री असताना पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. १०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणामध्ये जून महिन्यात सीबीआयने अनिल देशमुख यांच्याबरोबरच त्यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे, संदीप पलांडे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं.
दरम्यान अनिल देशमुख तुरुंगातून बाहेर येताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याचे जल्लोषात स्वागत केले.
मात्र देशमुख यांनी मुंबईबाहेर जाऊ नये अशी अट न्यायालयाने घातली आहे. त्यामुळे त्यांना नागपूर येथील आपल्या घरी आणि पर्यायाने तिथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात ते सहभागी होऊ शकत नाहीत.
SW/KA/SL
28 Dec. 2022