जुन्नरमधील १० बिबट्यांना जामनगरध्ये मिळालं नवं घर, अनंत अंबानीच्या प्राणी संग्रहालयात राहणार
मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जुन्नर वनपरिक्षेत्रातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यात हिंसक झालेले बिबटे पकडण्यात आले होते. या बिबट्यांवर माणिकडोह येथील बिबटे निवारा केंद्रात उपचार करण्यात आले. या बिबट्यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांना लवकरच गुजरातला पाठविण्यात येणार आहेत. जुन्नर वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १० बिबटे गुजरातमधील जामनगरच्या सेंट्रल झु-मध्ये स्थलांतरित केले जाणार आहेत. केंद्र सरकारने याबाबत परवानगी दिली आहे.
जुन्नर तालुक्यात वन्यप्राणी आणि मानवी संघर्ष वाढत चालला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात जनावरांसह, नागरिकही मृत्यूमुखी पडत आहेत. परिणामी हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. यादरम्यान आता हा प्रश्न कायमचा संपवण्यासाठी वनविभागाने एक मोठे पाऊल उचलले आहे. जुन्नरमध्ये पकडलेले बिबटे गुजरातच्या जामनगर येथील सेंट्रल झु मध्ये पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी दिली.
TR/ML/PGB
31 July 2024