‘आनंदाचा शिधा’ कुणाच्या आनंदासाठी, जनतेच्या की कंत्राटदारांच्या?
मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऐन सणासुदीला महाराष्ट्र सरकार आनंदाचा शिधा वाटप करत आहे. पण यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. निविदा न काढता थेट 900 कोटीच्या जवळपास निधी देऊन ठराविक कंत्राटदारांना याचे काम दिले जाते. वाटपाची यंत्रणा मागच्या वेळी अपुरी पडली. अगदी मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सुद्धा 37% लोकांनाच शिधावाटप झाला अशी आकडेवारी माध्यमात उपलब्ध आहे. याचाच अर्थ हा शिधा बाजारभावापेक्षा जास्त भावाने खरेदी कुणाच्या आनंदासाठी वाटला जात आहे.
शासनाने 239 रू किमतीने एक किट घेतले आहे. पण बाजारातील चना डाळ, रवा, साखर आणि पाम तेलाचे भाव पाहता हे सगळ फक्त 176 रुपयात बाजारात उपलब्ध आहे. मग हे अधिकचे पैसे कंत्राटदार आणि सरकारमधील काही लोकांच्या खिशात घालण्याचा हा कट आहे का.असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना ते असं म्हणाले, सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारच्या निर्देशानुसार लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे थेट लाभ दिला जावा. डिजिटल इंडियाचा आव आणून छाती बडवून घेणाऱ्या महायुती सरकारने थेट पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावरती वर्ग का केले नाही.
निविदा जाहीर न करता त्याच त्याच कंत्राटदारांना पुन्हा पुन्हा आनंदाचा वर्षाव का केला जात आहे. तीन दिवसांमध्ये कोणतीही प्रक्रिया पूर्ण न करता थेट काम देऊन कुणाची दिवाळी कोणाचा दसरा साजरा केला जातोय. यावरती एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे.
सणासुदीच्या काळात राज्यातील गोरगरीब जनतेला, जाहिरातबाजीच्या माध्यमातून आनंदाचा शिधा शंभर रुपयात मिळेल, अशा वल्गना करून गरिबांच्या आनंदाच्या नावावर कुणाची घबाड भरण्याचं काम सरकार करतेय याच स्पष्टीकरण राज्यातील 15 कोटी जनतेला सरकारने दिले पाहिजे. अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
आज राज्यामध्ये भीषण दुष्काळ पडलेला आहे. 122 वर्षातील सर्वाधिक कोरडा दुष्काळ म्हणून ऑगस्ट अशी नोंद या महिन्याची झालेली आहे. लोकांनी दुबार, तिबार पेरणी केली तरीही पाऊस नसल्यामुळे पेरलं ते उगवलं नाही, उगवलं ते टिकलं नाही, आणि टिकलं त्यातून विकण्यासारखं काही मिळेल अशी परिस्थिती सध्या दिसत नाही. म्हणून लोकांचे गौरी-गणपती हे सण खरंच सरकारला गोड व्हावेत असं वाटत असेल, तर यात चाललेला सावळा गोंधळ थांबवावा आणि पारदर्शक प्रक्रियेतून टेंडर काढून याच्या निविदा NeML NCDEX group of company या ई-पोर्टल द्वारे पार पाडाव्यात.
चोरासारखं मागच्या दाराने घाईघाईने करू नये. जर पुन्हा या प्रक्रियेमध्ये अशाच प्रकारे घाई गडबडीने सरकारने काही करण्याचा प्रयत्न केला, तर 15 कोटी जनतेचा प्रतिनिधी म्हणून जनतेच्या पैशाची चाललेली उधळपट्टी थांबवण्यासाठी मी आवाज उचलणार. असा जनतेचा पैसा कंत्राटदाराच्या घश्यात जाऊ देणार नाही.असा आक्रमक पवित्रा घेत विजय वडेट्टीवार यांनी इशारा दिला आहे.
ML/KA/SL
31 Aug 2023