सापाच्या आगमनामुळे ४० मिनिटे रखडला आंतरराष्ट्रीय टेनिस सामना

मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खेळाच्या मैदानावर अचानक एखाद्या पक्षी, प्राणी शिरल्यामुळे काहीवेळासाठी सामना थांबल्याच्या अनेक घटना तुम्ही लाईव्ह पाहील्या असतील. मात्र ऑस्ट्रेलियातील एका टेनिस सामन्यात चक्क सापाने एन्ट्री मारली. त्यामुळे सुरु असलेला सामना तब्बल ४० मिनिटे थांबवावा लागल्याची घटना घडली आहे. आज ब्रिस्बेन इंटरनॅशन स्पर्धेच्या पात्रता सामन्यात ही गंभीर घटना घडली. यावेळी डॉमिनिक थिएम आणि जेम्स मॅककेब यांच्यातील लढत सुरू होती.टेनिस कोर्टवर साप दिसताच सुरक्षा कर्मचारी त्वरीत मैदानात गेले. साप विषारी असल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच सामना थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या पात्रता सामन्यात २० वर्षीय जेम्स मॅककेब आणि डॉमिनिक थिएम आमनेासामने होते. या सामन्यात डॉमिनिक थिएम हा एक सेटने पिछाडीवर होता, तेव्हा प्रेक्षकांना टेनिस कोर्टवर साप आल्याचे आढळले. त्यानंतर त्यांनी खेळाडू आणि रेफ्रिच्या लक्षात ही गोष्ट आणून दिली. यावेळी उपस्थित सर्वांमध्येच भीतीचे वातावरण स्पष्ट दिसत होते. दरम्यान, टेनिस कोर्टवर आलेला साप ५० सेंटीमीटर लांब होता आणि ऑस्ट्रेलियातील सर्वात विषारी सापांपैकी एक असल्याचे सांगण्यात आले. यानंतर त्याला लवकरच तेथून काढून टाकण्यात आले. त्यानंतरच खेळ सुरू झाला.
सामन्याच्या शेवटी डॉमिनिक थिएम म्हणाला की, ‘मला प्राणी आवडतात. पण तो एक अतिशय विषारी साप होता आणि तो ‘बॉल किड्स’ च्या जवळ होता त्यामुळे ती परिस्थिती खूप धोकादायक होती’.पुढे तो म्हणाला की, ‘माझ्यासोबत असे कधीच घडले नाही आणि मी तो प्रसंग कधीच विसरणार नाही.’ हा सामना थीएम डॉमिनिकने २-६, ७-६ (४), ६-४ असा जिंकला.
SL/KA/SL
30 Dec. 2023