एक पणती पुरग्रस्तांसाठी मुंबई मराठी पत्रकार संघाचा अभिनव उपक्रम
मुंबई : अवघा देश दिवाळी साजरी करीत असताना मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ठ्रातील पूरग्रस्तांच्या घरी एन दिवाळीत अंधार दाटला आहे. हा अंधार दुर करण्यासाठी एक पणती पुरग्रस्तांसाठी हा अभिनव उपक्रम मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पुढाकाराने येत्या ३१ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.
या उपक्रमात अनेक सामाजिक संस्थांनी आपला सहभाग नोंदिवला आहे. यात विहंग प्रतिष्ठान, मुंबई मराठी पत्रकार संघ, श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट, जीएसबी देवालय ट्रस्ट, पल्लवी फाऊंडेशन आणि बालमोहन विद्यार्थी उत्कर्ष पालक समिती या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबिविला जाणार आहे. या उपक्रमासाठी योगदान म्हणून मुंबई मराठी पत्रकार संघाने यंदाच्या दिवळी अंक विक्रीतील सर्व नफाही पुरग्रस्तांच्या मदतीसाठी दिला आहे, अशी माहीती पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी दिली.
या सामाजिक उपक्रमासाठी मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रसाद मोकाशी यांच्या नेतृत्वाखील विशेष समीती गठीत करण्यात आली आहे. यात हेमंत सामंत, राजेंद्र साळसकर यांचा समावेश आहे अशी माहिती कार्यवाह शैलेंद्र शिर्के यांनी दिली.
31 ऑक्टोबरला पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिवाळी संध्या
पुरग्रस्तांच्या मदतीसाठी येत्या शुक्रवारी ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता झी मराठी वाहिनीवरील सारेगमप कार्यक्रमाद्वारे लोकप्रिय झालेला गायक मंगेश बोरगावकर यांच्या गीतांचा नजराणा दिवाळी संध्या म्हणून आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाद्वारे जमा होणारा निधी हा पूरग्रस्त भागातील शाळा उभारण्यासाठी तसेच काही घरांच्या पुननिर्माणासाठी वापऱण्यात येणार आहे.
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाने आलेल्या पूरस्थितीमुळे अनेक गावांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक घरे वाहून गेली तर अनेक संसार उद्ध्वस्त झाले तर अनेक शाळांमध्ये सर्व शालेय साहित्य वाहून गेले आहे. यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले तर अनेक गावांतील शाळांमध्ये शिकणा-या मुलांचे शिक्षण अर्धवट राहण्याची भीती निर्माण झाली. या सगळ्यांची नोंद घेण्यासाठी प्रसाद मोकाशी यांच्या नेतृत्वाखालील समितीने नुकताच या पुरग्रस्त भागाचा दौरा केला होता. तरी रसिकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची तिकीटे बुक माय शो तसेच शिवाजी मंदिर येथे उपलब्ध आहेत.