क्रीडामंत्री कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी
मुंबई, दि. १७ : महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे आणि बंधू विजय कोकाटे यांच्या विरोधात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने अटकेचे वॉरंट जारी केले आहे. शासकीय कोट्यातील दहा टक्के सदनिका गैरव्यवहारप्रकरणी कोकाटे यांना दोन वर्ष आणि दहा हजार दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रथम वर्ग न्यायालयाने दिलेली शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवताना कोकाटे यांच्या अटकेचे निर्देश दिले आहेत. माणिकराव कोकाटे हे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत. सिन्नर मतदारसंघातून पाच वेळा आमदार झाले आहेत. सध्या क्रीडा मंत्री आहेत. हे प्रकरण जुने असले तरी शिक्षा कायम झाल्याने त्यांचे राजकीय भवितव्य धोक्यात आहे. उच्च न्यायालयात अपील केले जाईल आणि तिथे शिक्षेवर स्थगिती मिळाली तर पद टिकू शकते.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात एकीकडे अटक वॉरंट जारी करण्यात आले असून दुसरीकडे माणिकराव कोकाटे हे लिलावती रुग्णालयातील अकराव्या मजल्यावर दाखल झाले आहेत. लिलावती रुग्णालयातील अकराव्या मजल्यावर त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकीकडे अटकेचे टांगती तलवार असताना दुसरीकडे माणिकराव कोकाटे रुग्णालयात उपचारासाठी दाखल असल्यामुळे याविषयी विविध चर्चा रंगली आहे.
नाशिक पोलिसांनी या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना त्वरित अटक करायला हवी. सत्ता स्थानी असलेल्या व्यक्तीकडून चूक होते, त्यावेळी नाशिक पोलिस कसे वागतात? यावरून त्यांचे मूल्यांकन करणार असल्याचे ॲड. असीम सरोदे यांनी म्हटले आहे. पोलिसांनी सतसतविवेक बुद्धीच्या आधारे पोलिसांना हा निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे आतापर्यंत चांगले चालत फिरत असलेले माणिकराव कोकाटे अचानक रुग्णालयात दाखल का झाले? या संदर्भात पोलिसांनी निर्णय घ्यायचा आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या कोकाटे यांना अटक करण्यासाठी पोलिसांना कोणत्याही आदेशाची आवश्यकता नसल्याचे सरोदे यांनी म्हटले आहे.
1995 सालच्या शासकीय सदनिका वाटपातील गैरव्यवहार प्रकरणात नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना दोन वर्षांच्या कारावासाची आणि 10 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा कायम ठेवली आहे. याआधी 20 फेब्रुवारी 2025 रोजी प्रथम वर्ग न्यायालयाने हीच शिक्षा सुनावली होती, जी आता अपीलात टिकली आहे. या निर्णयामुळे मंत्री कोकाटे यांचे मंत्रिपद आणि आमदारकी धोक्यात आली आहे, कारण दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षेच्या प्रकरणात सदस्यत्व आपोआप रद्द होऊ शकते.
SL/ML/SL