अमली पदार्थ विक्रीप्रकरणी आता मोक्का लावण्याची तरतूद …

मुंबई दि १४ — राज्यात अमली पदार्थांच्या विक्रीत वारंवार अटक करण्यात येऊनही जामीनावर सुटणाऱ्या आरोपींना मोक्का लावण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार आहे आणि कायदेशीर अज्ञान असणाऱ्या आरोपींचे वय कमी करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. याबाबतच्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते.
अमली पदार्थांच्या धंद्यात अल्पवयीन मुलांना सामील करुन घेण्यात येते आणि त्यांच्यामार्फत हे पदार्थ विक्री करून कायद्यातून पळवाट काढण्याचा प्रयत्न करण्यात येतो. त्यामुळे कायद्याच्या व्याख्येत बदल करून सोळा वर्षांच्या आरोपींना अटक करण्याची तरतूद करण्यात येईल आणि वारंवार असे गुन्हे करणाऱ्यांना मोक्का लावण्यासाठी कायद्यात बदल करण्यात येईल असं ते म्हणाले.

परदेशी नागरिक , विशेषतः नायजेरियन व्यक्ती या गुन्ह्यात सापडतात त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्याची तरतूद आहे मात्र त्यातून वाचण्यासाठी ते अन्य छोटे गुन्हे करून इथेच राहतात, केंद्र सरकारला हे लक्षात आणून दिल्यावर त्यांचे हे छोटे गुन्हे माफ करून त्या नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवण्यात येईल असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं.ML/ML/MS