आमखेडा भूमि कृषी पर्यटन केंद्रास आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन पुरस्कार…

वाशिम, दि २१(एमएमसी न्यूज नेटवर्क) : १६ मे २०२४ रोजी युरॅक रिसर्च सेंटर बोल्झानो इटली येथे संपन्न झालेल्या १७ व्या जागतिक कृषी पर्यटन दिनाच्या मुख्य कार्यक्रमात वाशिम जिल्हातील आमखेडा, येथील भूमी कृषी पर्यटन केंद्रास युरॅक संस्थेचे चेअरमन यांच्या हस्ते जागतिक कृषी पर्यटन पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला. १६ ते १८ मे दरम्यान बोल्झानो उत्तर इटली येथे जागतिक कृषी पर्यटन दिनाचे औचित्य साधून युरॅक रिसर्च, ग्लोबल ॲग्री टुरिझम नेटवर्क आणि कृषी पर्यटन विकास संस्था बारामती या तीन संस्थांच्या एकत्र विद्यमाने दुसऱ्या जागतिक कृषी पर्यटन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
कृषी पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्था, सरकारी, विद्यापीठे, संशोधन करणारे प्राध्यापक, शेतकरी वर्ग आणि संस्था या स्तरातून ७० देशातील ३८० प्रतिनिधी या परिषदेस उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे यंदाही कृषी पर्यटन राबवणारे शेतकरी, संस्था आणि व्यक्ती यांचा जागतिक कृषी पर्यटन पुरस्कार २०२४ देऊन सत्कार करण्यात आला.
२४ देशातील ३७ अर्ज या पुरस्कारासाठी प्राप्त झाले होते यातून निवड समितीने दहा अर्जाची निवड केली असून यात अमेरिकेतील चार भारतातील दोन , आलाबामा येथील एक, ऑस्ट्रेलिया येथील दोन तर तैवान येथील एक अशा कृषी पर्यटन केंद्राचा समावेश आहे. वाशीम जिल्ह्यातील आमखेडा येथील भूमि कृषी पर्यटन केंद्र मागील वीस वर्षापासून कृषी संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करते.
महात्मा गांधींनी घालून दिलेल्या पंचसूत्रीच्या आधारे अन्न स्वावलंबन, वस्त्र स्वावलंब, विद्युत स्वावलंब, स्वास्थ स्वावलंबन, शिक्षण स्वावलंब या पंचसूत्री वर आधारित नाविन्यपूर्ण प्रयोग या पर्यटन केंद्रास पहावयास मिळतात .
एकञ कुटुंब पद्धती तसेच स्वावलंबी गांव या स्वयंपूर्ण पद्धतीवर मागील वीस वर्षापासून पर्यटन केंद्र मार्फत इथे कार्य सुरू आहे. वाशीम जिल्ह्यात कृषी पर्यटनाबरोबरच सामाजिक अध्यात्मिक पर्यटन केंद्रास पुरेपूर वाव असून यासाठी भूमी कृषी पर्यटन केंद्र २१ कलमी कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. कृषी पर्यटन केंद्राच्या भरीव कार्याची दखल घेत यंदाचा जागतिक कृषी पर्यटन पुरस्कार २०२४ देण्यात आला या कार्यक्रमास विविध देशातील प्रतिनिधी उपस्थित होते.
ML/ML/SL
21 May 2024