अमित शहांनी केला केंद्रीय गृहमंत्री पदाच्या कार्यकाळाचा विक्रम

 अमित शहांनी केला केंद्रीय गृहमंत्री पदाच्या कार्यकाळाचा विक्रम

नवी दिल्ली, दि. ५ : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे भारतातील सर्वात जास्त काळ केंद्रीय गृहमंत्री राहिलेले व्यक्ती ठरले आहेत. ते २,२५८ दिवसांपासून या पदावर आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात ३० मे २०१९ रोजी शहा यांनी गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. शहा यांनी गृहमंत्री म्हणून त्यांचा पहिला कार्यकाळ ९ जून २०२४ रोजी पूर्ण केला. १० जून २०२४ रोजी ते पुन्हा गृहमंत्री झाले आणि तेव्हापासून ते या पदावर आहेत. गृहमंत्रालयाव्यतिरिक्त ते देशाचे पहिले सहकार मंत्री देखील आहेत. यापूर्वी शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि गुजरातचे गृहमंत्री राहिले आहेत.

योगायोगाने, शहा यांनी ५ ऑगस्ट रोजी सर्वात जास्त काळ गृहमंत्री राहण्याचा पराक्रम केला. २०१९ मध्ये याच दिवशी त्यांनी संसदेत जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतर जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा संपुष्टात आला.

त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा गृहमंत्री म्हणून विक्रम मोडला आहे. अडवाणी १९ मार्च १९९८ ते २२ मे २००४ पर्यंत एकूण २,२५६ दिवस देशाचे गृहमंत्री होते. अडवाणींनंतर काँग्रेस नेते गोविंद वल्लभ पंत हे सर्वाधिक काळ गृहमंत्री राहिलेले तिसरे आहेत.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ जुलै रोजी भारताचे दुसरे सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिलेले व्यक्ती बनले. त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा ४०७७ दिवसांचा (२४ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७७) विक्रम मोडला. पंतप्रधान मोदींनी २५ जुलै रोजी पंतप्रधान म्हणून ४०७८ दिवस पूर्ण केले.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *