अमेरिकी नागरिक वापरणार भारतात तयार झालेले iPhone

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Apple कंपनीने अमेरिकेत विक्रीसाठी असणाऱ्या सर्व iPhones २०२६ पर्यंत भारतात तयार करायचे ठरवले आहे. ही भारतासाठी मोठी संधी आहे. चीनवरील अवलंबित्व कमी करत आणि टॅरिफच्या दबावावर उपाय म्हणून Apple आपली उत्पादन प्रक्रिया भारताकडे वळवतो आहे. सध्या भारतामध्ये Foxconn आणि Tata Electronics या कंपन्यांमार्फत iPhones तयार करण्यात येतात. भारतामध्ये वार्षिक ४ कोटी iPhones तयार होतात, परंतु आता अमेरिकेतील मागण्या पूर्ण करण्यासाठी उत्पादन दुप्पट होण्याची शक्यता आहे. तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये भारताचे योगदान वाढताना दिसत आहे, आणि हा बदल भारताच्या जागतिक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात महत्त्वाची भूमिका ठरवतो आहे.
पुढील वर्षीपर्यंत अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या आयफोन्सची असेंब्ली भारतात हलवण्याची अॅपलची योजना आहे. तसेच, अॅपलच्या कंत्राटी उत्पादकांनी आधीच विद्यमान क्षमता वाढवण्यावर काम सुरू केले आहे. फॉक्सकॉनचा बेंगळुरू येथील प्लांट या महिन्यात कार्यरत होण्याची अपेक्षा आहे, ज्याची वार्षिक क्षमता कमाल २० दशलक्ष युनिट्स असेल. ब्लूमबर्ग न्यूजच्या अलीकडील अहवालानुसार, अॅपलने गेल्या वर्षी भारतात २२ अब्ज डॉलर्स किमतीचे आयफोन तयार केले, जो एक विक्रम आहे. जगभरात एकत्रित होणाऱ्या आयफोनपैकी जवळपास २०% आयफोन आता भारतात आहेत. कंपनीच्या पुरवठा साखळी धोरणात हा एक मोठा बदल मानला जात आहे.