अमेरिकेने थांबवली पाकिस्तानची मदत

वॉशिग्टन डीसी. दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकिस्तान सरकार दीर्घकाळापासून आर्थिक संकटाशी झुंजत आहे. देशाकडे फक्त 16 अब्ज डॉलरची परकीय गंगाजळी शिल्लक आहे. त्यातच आता अमेरिकेने पाकीस्तानला देण्याच्या मदतीचा हात आखडता घेतला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशानंतर अमेरिकेने पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या मदतीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या मदतीचे पुनर्मूल्यांकन करण्याचेही आदेश आहेत. जिओ न्यूजनुसार, या निर्णयामुळे पाकिस्तानमधील यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट एजन्सी (USAID) च्या अनेक महत्त्वाच्या योजना पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत.
अहवालानुसार, या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये ऊर्जा क्षेत्राशी संबंधित 5 योजना ठप्प झाल्या आहेत. याशिवाय आरोग्य, कृषी, अन्न सुरक्षा, पूर, हवामान आणि शिक्षणाशी संबंधित अनेक प्रकल्पांनाही याचा फटका बसला आहे. यातील काही कार्यक्रम कायमचे बंद होतील किंवा ते लक्षणीयरीत्या कमी होतील अशी भीती आहे.
ट्रम्प प्रशासनाने शुक्रवारपासून इस्रायल, इजिप्त आणि अन्न कार्यक्रम वगळता परदेशातील सर्व मदतीवर बंदी घातली आहे. न्यूज एजन्सी एएफपीनुसार, अमेरिकेच्या राज्य मंत्रालयाच्या या आदेशात गरीब देशांना आरोग्य मदत देण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
SL/ML/SL
29 Jan. 2025