रुग्णवाहिकेचा स्फोट; रुग्णमहिलेचा जागीच मृत्यू
अलिबाग, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात मुंबई पुणे महामार्गावर खोपोली नजिक एका रुग्णवाहिकेचा स्फ़ोट झाला. त्यात रुग्णवाहिकेतील रुग्णमहिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.
खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला असून त्यात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव निलव्वा कवलदार असे होते. तिला या रुग्णवाहिकेतून व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन सपोर्टवर गुलबर्गा (कर्नाटक) येथे नेले जात होते. अपघात
स्थळानजिक रुग्णवाहिका आल्यानंतर रुग्णवाहिकेत बिघाड झाल्याचे चालकाच्या लक्षात आले.
त्याने रुग्णवाहिका थांबविली, तितक्यात रुग्णवाहिकेने पेट घेतला. अन्य प्रवासी बाहेर पडले.
मात्र, तितक्यात आतील ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाला आणि रुग्ण महिलेचा स्फ़ोटात जागीच मृत्यू झाला. अपघाताची बातमी कळताच वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस, देवदूत यंत्रणा, आयआरबी पेट्रोलिंग, फोर्स महाराष्ट्र सुरक्षा बल, लोकमान्य रुग्णवाहिका सेवा आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी धाव घेऊन मदत आणि बचावकार्य केले.
काल सायंकाळी ५ च्या सुमारास मुंबई पुणे लेनवर खोपोली येथे हा अपघात झाला. या अपघातात रुग्णवाहिका आणि पोलिसांची युनिकॉन मोटरसायकल जळून खाक झाली आहे. ही रुग्णवाहिका पेटत्या स्थितीत ५० मिटर मागे येऊन त्यातील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्याने रुग्णवाहिकेच्या छताचा पत्रा इतर लोखंडी पार्ट रोडवर इतस्ततः पडले होते.
ML/KA/SL
1 Nov. 2023