अंबरनाथ तालुका पत्रकार संघ ठरला आदर्श संघ

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारया वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कारांची आज एस.एम.देशमुख यांनी घोषणा केली आहे. प्रत्येक महसूल विभागातून एक याप्रमाणे राज्यातील आठ तालुका पत्रकार संघ या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. यात कोकण विभागात अंबरनाथ तालुका पत्रकार संघाला पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. विविध उपक्रम, कार्यक्रम, संवेदनशील पत्रकारिता, शहर विकासात भूमिका अश सर्व बाजूंचा विचार करून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
अंबरनाथ पत्रकार संघाचे प्रतिनिधी, आदर्श बदलापुरचे संपादक आणि ठाणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संजय साळुंके आणि लोकसत्ता प्रतिनिधी सागर नरेकर यांनी या पुरस्कारासाठी पत्रकार संघाचा प्रस्ताव सादर केला होता. येत्या 13 जानेवारी रोजी माहूर येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याचे एस.एम देशमुख यांनी स्पष्ट केले..
मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न राज्यातील अनेक जिल्हा आणि तालुका पत्रकार संघ आपआपल्या कार्यक्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपत कार्य करीत असतात, तसेच मराठी पत्रकार परिषदेचे सर्व उपक्रम यशस्वीपणे राबवत असतात.. अशा तालुका आणि जिल्हा पत्रकार संघांचा राज्यस्तरावर गौरव करण्याचा निर्णय परिषदेने घेतला. त्यानुसार गेली दहा वर्षे मराठी पत्रकार परिषद हे पुरस्कार देत आहे.
मराठी पत्रकार परिषदेचे भूतपूर्व अध्यक्ष “संध्या” कार वसंतराव काणे आणि “संचार” कार रंगा अण्णा वैद्य यांच्या नावाने हे पुरस्कार दिले जातात. मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
ML/KA/SL
3 Dec. 2023