आंबेनळी घाटात
पावसामुळे रानकडसरी टोकाजवळ दरड कोसळली.

महाड दि २६– रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाने गेली अनेक दिवस धुमाकूळ घातला असून काल रात्रीपासून धुवाधार पाऊस पडत असून महाड तालुक्यातील सावित्री नदीचे पाणी ढवळी कामथी व घोडवणी चोळई नदीतुन पाणी वाहू लागले आहे. महाबळेश्वर प्रतापगड परिसरात रात्रीपासून पाऊस पडत असल्याने आंबेनळी घाटा मध्ये काम चालू असल्याने गटारे मातीच्या भरावाने भरून गेली आहेत.
डोंगर दऱ्या मधून येणाऱ्या ओहोळाचे पाणी रस्त्यावर येत असल्याचे वास्तव समोर आले आहे. सध्या आंबेनळी घाटामध्ये रस्ता रुंदीकरणाचे काम चालू असल्याने डोंगराच्या बाजूने खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे माती सैल होऊन रानकडसरी टोकाजवळ दरड कोसळून मातीचा भराव रस्त्यावर आला आहे. दोन- तीन ठिकाणी झाडे रस्त्यावर येऊन वाहतूक बंद झाली होती. मात्र प्रवाशांनी झाडे बाजूला करून वाहतूक चालू केली.
त्यानंतर प्रशासन तर्फे जेसीबी पाठवून झाडे व मातीचा ढिगारा बाजूला करण्यात आला आहे. पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यावर आंबेनळी घाटामध्ये संबंधित खात्याकडून रस्ता रुंदीकरणाचे काम चालू आहे. मात्र हे काम उशिरा सुरू केल्याने या रस्त्यावरून वाहतूक करणे धोक्याचे बनले आहे.
रस्त्याच्या साईड पट्टी खोदल्याने वाहनांना साईट देताना अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. गटारे मातीच्या भरावाने भरून गेल्याने दरी डोंगरातून येणारे पाणी सरळ रस्त्यावर येत आहे. त्यामुळे पावसाळ्यात आंबेनळी घाट आणि अवघड वाट अशी अवस्था या रस्त्याची होईल अशी भीती या मार्गवरील प्रवासी वर्ग व्यक्त करत आहेत.ML.MS