अंबाबाई मूर्तीवर सुरू झाली संवर्धन प्रक्रिया, मूर्तीचे दर्शन बंद….

कोल्हापूर दि १२– करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या मूर्ती संवर्धन प्रक्रियेसाठी औरंगाबादच्या भारतीय पुरातत्व विभागाचा चमू काल म्हणजे सोमवारी रात्री कोल्हापूरात दाखल झाला. आज आणि उद्या असे दोन दिवस हा चमू मूर्ती संवर्धन प्रक्रिया पूर्ण करणार आहे. आजपासून मूर्तीचे गाभाऱ्यातील मुख्य मूर्तीचे दर्शन भाविकांसाठी बंद झाले. परंतु या दोन दिवसांसाठी भाविकांकरीता उत्सवमूर्ती व मंगल कलश दर्शनासाठी ठेवण्यात आला आहे.
श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती सुस्थितीत राहावी, या उद्देशाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भारतीय पूरातत्व सर्वेक्षण विभागाकडे मूर्तीची पाहणी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज सदरचा चमू कोल्हापूरात पाहणीसाठी दाखल झाला. यापूर्वी सन 2023 आणि एप्रिल 2024 मध्ये हा चमू मूर्तीच्या पाहणीसाठी कोल्हापूरात आला होता आणि त्यांनी विविध सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सध्या मुर्तीची देखभाल होते की नाही, याची पाहणी व आवश्यक सुचना देण्यासाठी व मूर्तीवर प्रक्रिया करणेसाठी हा चमू दाखल झाला आहे.
सध्या श्रावण महिना सुरू आहे. श्रावण सोमवारच्या उद्देशाने भाविकांनी आजही श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात गर्दी केली होती. परंतु भाविकांनी उत्सवमूर्ती व मंगल कलश दर्शनासाठी ठेवला होता. काल सकाळी साडेदहा वाजता उत्सवमूर्तीसाठीची पुजाविधी सुरू करण्यात आल्या. त्यानंतर साडे अकरा वाजता भाविकांसाठी उत्सव मूर्ती व मंगल कलशाचे दर्शनासाठी खुले करण्यात आले. मुख्य मूर्तीच्या ऐवजी पितळी उंबऱ्याच्या आतील बाजूस असलेल्या कासव चौकामध्ये मंगल कलश व उत्सव मूर्ती ठेवण्यात आली आहे.
काल रात्री साडे आठ वाजता औरंगाबादचे भारतीय सर्वेक्षण विभागाच्या पुरातत्व विभागाचे उपअधीक्षक डाँक्टर विनोद कुमार व त्यांचे सोबत निलेश महाजन, सुधीर वाघ, मनोज सोनवणे दाखल झाले आहेत. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह हा चमू रात्री मंदिराची पाहणी करत होते. या संवर्धन प्रक्रियेमुळे मूर्तीचे जतन होणार असून तिचे ऐतिहासिक महत्व जपले जाणार आहे. संवर्धन प्रक्रियेच्या दोन दिवसांसाठी भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान समितीच्यावतीने करण्यात आलं आहे. येत्या 13 आँगस्टपासून देवीचे नियमित दर्शन पुर्ववत सुरू होणार आहे.ML/ML/MS