अमरावतीत विमान सेवा सुरू, पहिल्या विमानाचं वॉटर सॅल्यूटनं खास स्वागत

अमरावती, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या अनेक वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या अमरावती विमानतळाचा लोकार्पण सोहळा बुधवार (१६ एप्रिल) रोजी पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,एकनाथ शिंदे,केंद्रीय उड्डाण मंत्री कीजरापू राम मोहन नायडू यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन झाले. यावेळी ७२ सीट आसनी पहिलं विमान अमरावती विमानतळावर दाखल झालं. तेव्हा वॉटर सॅल्यूटनं खास स्वागत करण्यात आलं. दरम्यान, या विमानतळ उद्घाटन सोहळ्यासोबतच दक्षिण आशियातील सर्वात मोठे पायलट प्रशिक्षण केंद्रही सुरु होणार असल्याची चर्चा आहे. येत्या जुलै महिन्यापासून हे प्रशिक्षण केंद्र सुरु होणार आहे.
आता आठवड्यातुन सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे तीन दिवस अमरावतीकरांना विमानवारी करता येणार आहे. अमरावती विमानतळ विदर्भाची अर्थव्यवस्था, व्यापार,पर्यटन आणि हवाई संपर्कासाठी गेम चेंजर ठरणार असून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी udan योजनेंतर्गत विकसित हे विमानतळ केवळ पायाभूत सुविधा नव्हे,तर उद्योग,
व्यवसाय आणि प्रवासासाठी सुवर्णद्वार ठरणार आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी अंतर्गत अमरावती विमानतळ हे राज्यातील तिसरे व्यावसायिक विमानतळ आहे.